मतदारांसोबत आता ‘फॅमिली सेल्फी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

निवडणूक आयोगाने प्रत्येक बीएलओला मतदाराच्या घरी जावून फॅमिली सेल्फी काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बीएलओंना काम न ‘दाखवता’ प्रत्यक्ष काम करुन सेल्फी फोटो सुद्धा मोबाईल ॲपवर अपलोड करावे लागतील.

अकोला : मतदारांचे नाव, पत्ता व मतदारसंघातील बदलाचा घोळ टाळण्यासाठी आता बीएलओंना मतदारांच्या घरी जावून त्यांच्यासोबत ‘सेल्फी’ काढावी लागणार आहे. संबंधित सेल्फी बीएलओला निवडणूक आयोगाच्या ॲपवर अपलोड सुद्धा करावी लागेल. मतदारांच्या घरी न जाता कागदी घोडे नाचवणाऱ्या बीएलओंना (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) काम केल्याचा पुरावाच निवडणूक आयोगाने सेल्फीच्या स्वरूपात मागितल्याने बीएलओंची डोकेदुखी वाढली आहे.

निवडणूक आयोगाने मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 30 जानेवारीपर्यंत मतदारांना नाव, पत्त्यात बदल व नवीन नाव जोडण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2020 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे मतदार सदर अभियानाअंतर्गत त्याचे नाव मतदार यादीत समाविष्ठ करु शकतील. व्यतिरीक्त आधीपासूनच मतदार यादीत नाव असलेले मतदार त्यांच्या नाव, पत्त्यासह इतर बाबींमध्ये बदल करु शकतील. त्यासाठी बीएलओंना मोबाईल ॲपमधूनच मतदारांच्या आधीच्या माहितीत बदल करावा लागेल. 

मतदाराला त्याच्या फोटोत सुद्धा बदल करुन नवीन फोटो मतदार प्रमाणपत्रात टाकता येईल. ही सर्व प्रक्रिया योग्यरित्या पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक बीएलओला मतदाराच्या घरी जावून फॅमिली सेल्फी काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बीएलओंना काम न ‘दाखवता’ प्रत्यक्ष काम करुन सेल्फी फोटो सुद्धा मोबाईल ॲपवर अपलोड करावे लागतील.

असा आहे पुनरिक्षण कार्यक्रम

  • इंटीग्रटेड मतदार यादी प्रसिद्ध करणे - 30 डिसेंबर
  • दावे-हरकती स्वीकारण्याचा कालावधी - 30 डिसेंबर ते 30 जानेवारी
  • विशेष मोहिमेचा कालावधी - 4, 5, व 11, 12 जानेवारी 2020
  • दावे-हरकती निकाली काढणे - 10 फेब्रुवारी
  • डाटाबेसचे अद्यावतीकरण व पुरवणी यादी छपाई - 26 फेब्रुवारी 2020 पूर्वी
  • अंतिम मतदार यादी प्रसिद्धी - 2 मार्च 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family selfie with voters