esakal | अन्‌ जिल्ह्यातील ते सहा रुग्ण टाळ्यांच्या गजरात गेले घरी...डॉक्‍टरांनी दिल्या शुभेच्छा
sakal

बोलून बातमी शोधा

गडचिरोली : कोरोनामुक्तांना टाळ्या वाजवून निरोप देताना रुग्णालयातील डॉक्‍टर्स व कर्मचारी.

साक्षात यमराजाचे रूप घेऊन जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना आजारावर यशस्वी मात करून बरे झालेल्या सहा कोरोनामुक्तांना रविवारी (ता. 12) रुग्णालयातील डॉक्‍टर्स, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला.

अन्‌ जिल्ह्यातील ते सहा रुग्ण टाळ्यांच्या गजरात गेले घरी...डॉक्‍टरांनी दिल्या शुभेच्छा

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : जिल्ह्यातील या सहा कोरोनाबाधितांनी संसर्गावर यशस्वी मात केल्याने त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांमध्ये अहेरी 2, गडचिरोली 2, धानोरा व चामोर्शी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफमधील 1 व अहेरी येथील 1 जवानाचे कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले.

मुलचेरा येथील एकाचे कोरोना निदान झाले आहे. यामध्ये मुलचेरा येथील मुख्याधिकाऱ्यांच्या 20 तीव्र जोखमीतील व्यक्तींपैकी एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला आहे; तर 7 निगेटिव्ह व 12 अहवाल प्रतीक्षेत आहेत.

निरोगी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

रविवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात बऱ्या झालेल्या रुग्णांना घरी सोडताना गृह विलगीकरणातील महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच डिस्चार्ज किटचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किनलाके, सहायक अधिसेवक शंकर तोगरे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या सर्व सहाही रुग्णांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

हेही वाचा : या मळ्यांमुळे एकेकाळी पवनी होते समृद्ध; आता लोपले ते ऐश्‍वर्य...

बरे होण्याचे प्रमाण शंभर टक्‍के

जिल्ह्यात एकूण 166 कोरोनाबाधितांपैकी 71 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित रुग्णही उपचारास चांगला प्रतिसाद देत आहेत. तेही येत्या काळात कोरोनामुक्त होतील, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी व्यक्त केली आहे. सिरोंचा येथील एक हृदयविकाराचा रुग्ण सोडला, तर आतापर्यंत सर्वच कोरोनाबाधित रुग्ण दहा दिवसांनंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शंभर टक्‍क्‍यांपर्यंत आहे, असे जिल्हाधिकारी सिंगला यांनी म्हटले आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)