वैतागलेल्या शेतकऱ्याने उभ्या पिकालाच लावली आग

दीपक फुलबांधे
Monday, 2 November 2020

पीडित शेतकऱ्याने तुडतुडा नियंत्रणासाठी जवळपास 10 हजाराहून अधिक किमतीच्या कीटकनाशकांची फवारणी देखील केली. मात्र, फवारणी करूनही किड नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी काही दिवसांपासून चिंताग्रस्त होता. दरम्यान, त्याने तुडतुडा नियंत्रणासाठी तालुका कृषी विभागाकडे उपाययोजना व मार्गदर्शन करण्याची विनवणी केली.

लाखांदूर : ऐन कापणीच्या वेळी शेतातील धान पिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पीक नष्ट झाल्याचे पाहून वैतागलेल्या शेतकऱ्याने उभ्या पिकाला आग लावली. ही घटना लाखांदूर तालुक्‍यातील तिरखुरी येथे सोमवारी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली. विश्‍वनाथ चौधरी (वय 46), असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

पीडित शेतकऱ्याचे तिरखुरी येथे गट क्रमांक 248 मध्ये 0.62 हेक्‍टर शेती आहे. या शेतात यंदा खरीप हंगामात जवळपास 135 दिवस मुदतीचे गंगा-कावेरी वाणाच्या धानाची लागवड केली होती. आता पीक कापणीला आले असताना पिकावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला.

हेही वाचा 'खासदार बाळू धानोरकरांचा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल'

यावेळी पीडित शेतकऱ्याने तुडतुडा नियंत्रणासाठी जवळपास 10 हजाराहून अधिक किमतीच्या कीटकनाशकांची फवारणी देखील केली. मात्र, फवारणी करूनही किड नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी काही दिवसांपासून चिंताग्रस्त होता. दरम्यान, त्याने तुडतुडा नियंत्रणासाठी तालुका कृषी विभागाकडे उपाययोजना व मार्गदर्शन करण्याची विनवणी केली. परंतु, संबंधित विभागाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाला. आता पिकाची कापणी करूनही त्यावरील खर्च व पीक लागवडीवरील खर्च भरून निघण्याची शक्‍यता नव्हती. शेवटी वैतागलेल्या शेतकऱ्याने शेतातील उभ्या पिकाला आग लावली. त्याने शेतातील संपूर्ण पीक जाळून टाकले आहे. 

हेही वाचा - विदारक सत्य! या गावात मृत्यू झाल्यास भर रस्त्यात केले...

पीकविमा लागू करा -
कधी पुरामुळे तर, कधी परतीच्या पावसाने यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ऐन कापणीच्या काळात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी लागवडीवर केलेला खर्च वजा जाता उत्पन्न शून्य येण्याची भीती आहे. याच धास्तीने शेतकऱ्यांकडून टोकाचा निर्णय घेतला जात आहे. तेव्हा शासनाने तत्काळ दखल घेऊन किडी व रोगबाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुक्‍यात 100 टक्‍के पीक विमा लागू करावा, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer burned rice crop due to hopper in lakhandur of bhandara