वीजतारांच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 August 2019

चांदूरबाजार (जि. अमरावती) : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शामुळे शेतातच शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइकांसह ग्रामस्थांनी आक्रोश केल्याने अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वडुरा गावात शनिवारी (ता. दहा) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. विश्वंभर काकडे (वय 55) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

चांदूरबाजार (जि. अमरावती) : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शामुळे शेतातच शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइकांसह ग्रामस्थांनी आक्रोश केल्याने अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वडुरा गावात शनिवारी (ता. दहा) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. विश्वंभर काकडे (वय 55) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांसह नातेवाइकांनी वीज कंपनीवर गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेतल्यामुळे पोलिसांपुढे पेच निर्माण झाला होता. विश्वंभर काकडे हे शेतामध्ये सकाळी आठच्या दरम्यान चक्कर मारायला गेले होते. त्यांच्या शेतातील विजेचे खांब आणि तारा खाली जमिनीपर्यंत वाकल्या आहेत. तारेत विद्युत प्रवाह कायम असल्यामुळे शेतात जाताना त्या तारेच्या दहा ते पंधरा फूट लांब असतानासुद्धा जिवंत वाहिनीकडे व्यक्ती सहजच ओढल्या जात होता. अशा स्थितीत शेतकरी श्री. काकडे यांनाही विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात शेतकऱ्यांनी अनेक वीज कंपनीकडे तक्रारी केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कंपनीने हलगर्जीपणा केल्यामुळेच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. महावितरणच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी रेटून धरली. घटनास्थळी नायब तहसीलदार नीलिमा मते तसेच ठाणेदार साळुंके दाखल झाले होते.
आर्थिक मदत व नोकरीचे आश्‍वासन
नियमानुसार महावितरणकडून मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत दिली जाईल. सोबत शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी मिळावी म्हणून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे लेखी आश्‍वासन नातेवाइकांना वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले.
सातरगावच्या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू
सातरगाव येथे शेतातील धुऱ्यावर शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. नऊ) रात्रीच्या सुमारास घडली. विजय बापूराव कामडी (वय 50) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विजय कामडी यांच्याकडे अडीच एकर शेत असून ते शुक्रवारी रात्री शेतात जात असताना एका शेतात पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत ताराला त्यांचा स्पर्श झाला. त्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. 10) सकाळी उशिरापर्यंत कामडी हे घरी न परतल्याने कुटुंबातील काही जण शेतात बघण्यासाठी गेले असता हा प्रकार समोर आला. घटनेचा तिवसा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी तिवसा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer dies by touch of lightning