esakal | अतिवृष्टी आणि कीडरोगाने सडले पीक अखेर बळीराजाने विष प्राशन करून संपवले जीवन 
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer end his life as his crops are damaged due to rain

प्रशासनाकडून मदत जाहीर झाली मात्र अजूनही ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. मात्र यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेला बळीराजा टोकाचे पाऊल उचलत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.   

अतिवृष्टी आणि कीडरोगाने सडले पीक अखेर बळीराजाने विष प्राशन करून संपवले जीवन 

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

लाखांदूर (जि. भंडारा)  : यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी संकटांची मालिका घेऊन आल्याची  चिन्हे दिसतं आहेत. आधी अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि आता पिकांना लागलेली कीड यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासन आणि प्रशासनाकडून मदत जाहीर झाली मात्र अजूनही ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. मात्र यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेला बळीराजा टोकाचे पाऊल उचलत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.   

शेतातील शेतपीक पूर व किडरोगाने ग्रस्त झाल्याने घरात कोणीही नसल्याचे पाहुन मानसिक तणावात येउन एका 40 वर्षीय  शेतकऱ्याने  विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना रविवारी सकाळी 10 वाजताचे सुमारास लाखांदूर  तालुक्यातील पाचगाव येथे घडली. 

हेही वाचा - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध

मनोज खुशाल दोनाडकर (40) रा.पाचगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिस सुत्रानुसार घटनेतील मृतकाकडे मालकी साडेतीन ते चार एकर शेतजमीन आहे. या जमिनीत यंदाच्या खरिपात धान पिकाची लागवड देखील केली आहे.

मागील दोन महिन्यापूर्वी आलेल्या पुरासह परतीच्या पावसाने व किडरोगाने लागवडीखालील पिकशेती नष्ट झाल्याचे पाहुन गत काही महिन्यांपासून मानसिक तणावात दिसून येत असल्याचे गावक-यांनी सांगितले. 

नक्की वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला

दरम्यान घटनेच्या दिवशी घरात कोणीही नसल्याचे पाहुन मृतकाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर घटनेची माहिती कुटुंबियांना होताच संबन्धितांनी मृतकाला उपचारार्थ भंडारा येथे हलवित असतांना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची नोंद पालांदूर पोलीसांनी केली असुन पुढील तपास सुरु आहे.

संपादन - अथर्व महांकाळ