esakal | Video : जीवन चलने का नाम! शेतकरी कुटुंब रंगले हळदी विक्रीच्या रंगात
sakal

बोलून बातमी शोधा

halad final

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ ठप्प झाली. घाम गाळून पिकविलेल्या हळदीचे काय होईल, या विचाराने चिंताग्रस्त झाले. विविध समस्या उभ्या ठाकल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सतावत होता. थांबायचं तरी किती दिवस ? अखेर कौटुंबिक चर्चेतून ' प्रकाशवाट ' सापडली. हळदीची पावडर तयार करून विक्री करण्याचा संकल्प प्रकाश दुधे यांनी केला.

Video : जीवन चलने का नाम! शेतकरी कुटुंब रंगले हळदी विक्रीच्या रंगात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दारव्हा (जि. यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्‍यात असलेल्या महागाव कसबा येथील प्रकाश दुधे या शेतकऱ्याने परिस्थितीवर मात करत चक्क शेतात पिकविलेल्या हळदीची पावडर विकून आयुष्यात ' प्रकाशवाट ' निर्माण केली आहे. शेतकरी प्रकाश दुधे यांनी पारंपारिक पिकासोबत प्रथमच हळदीची लागवड केली.

त्यांचेकडे एकूण सहा एकर शेती. त्यापैकी अर्धा एकर क्षेत्रात त्यांनी हळदीचा प्रयोग केला. प्रचंड कष्ट घेतले. काळजी घेतली. शिवारात हळद बहरली. चांगले उत्पादन झाले. एकोणवीस क्विंटल हळद झाली. घरातील अंगणात हळद वाळू घातली. बाजार पेठेत विक्री करून चांगला भाव मिळेल, अशी आशा निर्माण झाली. मात्र त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. हिरमोड झाला. त्यांचा उत्साहच ' लॉकडाऊन ' झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ ठप्प झाली. घाम गाळून पिकविलेल्या हळदीचे काय होईल, या विचाराने चिंताग्रस्त झाले. विविध समस्या उभ्या ठाकल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सतावत होता. थांबायचं तरी किती दिवस ? अखेर कौटुंबिक चर्चेतून ' प्रकाशवाट ' सापडली. हळदीची पावडर तयार करून विक्री करण्याचा संकल्प प्रकाश दुधे यांनी केला.

सर्वप्रथम एक क्विंटल हळदीची दगडी खलबत्यामध्ये घरीच बारीक कांडणी केली. चक्कीवर पावडर काढली. संपूर्ण कुटुंब हळदीमध्ये रंगून गेले. शुद्ध अस्सल हळद पावडर पाकिटात पॅक केली आणि महागाव परिसरातील खेड्यांमध्ये दुचाकीने प्रवास करीत चक्क हळदीची विक्री केली.

सविस्तर वाचा - का केली आयुक्‍त मुंढेविरुद्ध महापौर जोशींनी पोलिसात तक्रार? वाचा

सोशल डीस्टन्सिंगचे पालन करीत गावोगावी फिरले. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर प्रकाश दुधे यांनी लॉकडाऊनमधील समस्यांवर मात केली. शेतात स्वतः कष्टाने पिकविलेल्या हळदीचे मार्केटिंग करतांना त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता. चांगला आर्थिक लाभ झाला. चालू हंगामात हळद लागवड क्षेत्र वाढविणार असल्याचे प्रकाश सांगतात. भविष्यात नियोजपूर्वक हळद पावडर विक्रीचा गृहउद्योग उभारण्याचा त्यांचा मानस आहे. संकटकाळात एका शेतकऱ्याच्या जिद्दीची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे..!