शेतकऱ्यांना पडली "चायना' फवारणी पंपाचीच भुरळ,वेळेची बचत, कमी खर्च

विनोद पाटील
Monday, 6 July 2020

मजुरांअभावी फवारणीसाठी शेतकऱ्यांना स्वयंचलित फवारणी पंपाची माहिती मिळताच त्यांच्याकडून या पंपाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.

वर्धा : चीनसोबत सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी शासनाकडून 59 चिनी ऍपवर बंदी घातली. असे असताना फवारणीसाठी शेतकऱ्यांचा कल मात्र "चायना' पंपाकडे आहे. पारंपरिक हाताने दांडा हलवून फवारणी करण्यापेक्षा थोड्या मेहनतीत आणि कमी वेळात पिकांवर औषध फवारणी करणे शक्‍य असल्याने या पंपाची शेतकऱ्यांना भुरळ पडली आहे.

पेरण्या झाल्या. पीक आता फवारणीवर आले. मजुरांअभावी फवारणीसाठी शेतकऱ्यांना स्वयंचलित फवारणी पंपाची माहिती मिळताच त्यांच्याकडून या पंपाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. शेतींमध्ये अधिक दर्जेदार पीक उत्पादनांसाठी कीटकनाशके, विद्राव्यखते, बुरशीनाशके, तणनाशके यांची फवारणी महत्त्वाची ठरते. सध्या कमी खर्चाच्या शेतीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जाते. यात खर्च आणि वेळही वाचतो.

हेही वाचा : मोठी बातमी : निरोगी व्यक्‍तींवर होणार कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी, नागपुरातील या रुग्णालयात सुविधा...

अशात बाजारात स्वयंचलित चायना फवारणी पंप दाखल झाल्याने सध्या त्यांच्या खरेदीकरिता कृषी साहित्य विक्री दुकानांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. कमी खर्चात बॅटरीवर चालणारा चायना फवारणी 12 व्होल्टच्या बॅटरीवर चालतो. सोबत चार्जरपण मिळते.

या पंपाची क्षमता 10 ते 20 लिटर आहे. वजनाने हलका असल्यामुळे शेतकऱ्यांची फवारणी लवकर उरकते. एकदा चार्ज केल्यानंतर पाच ते सहा तो तास चालतो. या फवारणी पंपाची किंमत 2,200 पासून 3500 रुपयापर्यंत आहे. काही नामांकित उत्पादक कंपन्या बॅटरीसाठी सहा महिन्यांची वॉरंटीदेखील देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अलीकडच्या काळात या पंपांचा वापर वाढला आहे.

पेट्रोलवर चालणारा चिनी पंप बाजारात
पेट्रोलवर चालणारा चिनी बनावटीचा पंप बाजारात तीन हजारांपासून पाच हजार रुपयांपर्यंत मिळतो. त्यामुळे कमी वेळात जास्त फवारणी होते. या पंपातून निघणारे तुषार हलके राहत असल्याने ते हवेत जास्त काळ राहतात. शेतकऱ्यांकडून काळजी घेण्यास दुर्लक्ष झाल्यास यातून विषबाधेचा धोका उद्‌भवतो.

जुन्या पद्धतीनुसार शेतात फवारणी करण्यासाठी अधिक श्रम आणि खर्च लागतो. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेला स्वयंचलित चायना पंप घेऊन फवारणी केल्यास वेळेची आणि पैशाची बचत होते.
 ज्ञानेश्‍वर वंजारी,
शेतकरी, तळेगाव (टा.)

कोरोनामुळे मजूर मिळणे अवघड झाले आहे. मिळाल्यास मजुरी परवडत नाही. शेतमालाला भाव मिळाले नाही. बी-बियाण्यांच्या किंमती वाढल्या. यामुळे शेती करणे अवघड झाले. अशात चायना पंपाची किंमत गत वर्षीच्या तुलनेत 300 ते 400 रुपये वाढली तरी फवारणीसाठी सोयीचा ठरत आहे.
 प्रमोद महल्ले,
शेतकरी, आमला

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are fascinated by the "China" spray pump