esakal | कास्तकारांनो जीवावर उदार होऊ नका! शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी.. पण काय आहे कारण..वाचा  
sakal

बोलून बातमी शोधा

farmers are not getting enough Urea in Yavatmal

जिल्ह्यात यंदा नऊ लाखांहून अधिक हेक्‍टरवर खरीप हंगामाची लागवड झाली आहे. त्यासाठी बी-बियाणे, खते, कीटकनाशक आदींचे नियोजन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले होते.

कास्तकारांनो जीवावर उदार होऊ नका! शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी.. पण काय आहे कारण..वाचा  

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : यंदा जुलै महिन्यापासूनच जिल्ह्यात युरियाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 57 हजार मेट्रिक टन खत येणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ 40 हजार मेट्रिक टन जिल्ह्याला प्राप्त झाले असून 17 हजार टनाचा तुटवडा आहे.

जिल्ह्यात यंदा नऊ लाखांहून अधिक हेक्‍टरवर खरीप हंगामाची लागवड झाली आहे. त्यासाठी बी-बियाणे, खते, कीटकनाशक आदींचे नियोजन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले होते. असे असले तरी सुरूवातीला सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. सोयाबीनचा निर्माण झालेला तुटवडा कृत्रीमरित्या कृषी केंद्रचालकांनी केल्याची बाब उघडकीस आली होती. 

यावर्षी कसा साजरा होणार स्वातंत्र्यदिन? शाळांमध्ये ध्वजारोहण करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिल्या या महत्वाच्या सूचना

अशात शेतकऱ्यांनी मिळेल त्या कंपनीच्या बियाण्यांची लागवड केली. मात्र, सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. या संदर्भात जिल्ह्यात तब्बल 12 हजारांवर तक्रारी दाखल झाल्या आहेत. अशा परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता युरियाची अडचण भेडसावत आहे. सध्या जिल्ह्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

आतापर्यंत जिल्ह्याला 40 हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे. जेव्हा की या महिन्याअखेरपर्यंत जिल्ह्याला 57 हजार 870 मेट्रिक टन खत येणे अपेक्षित होते. आवंटनाच्या तुलनेत तब्बल 17 हजार मेट्रिक टन खत अप्राप्त असल्याने शेतकऱ्यांना खतासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. खरीप हंगामासाठी यंदा जिल्ह्याची मागणी 63 हजार 200 मेट्रिक टनाची आहे. मात्र, सप्टेंबर अखेरपर्यंत नियोजित आवंटन येण्याची शक्‍यता कमीच आहे. 

शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली

सध्या पिकांना युरियाची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून मागणीत वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत आवक खूपच कमी आहे. एप्रिल, मे व जून महिन्यात लॉकडाउन असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्याचा परिणाम रॅक पाईन्टवर झाला. खत मिळत नसल्याने सुरुवातीला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खतांची साठवणूक केली. मात्र, ही केवळ मोजक्‍या शेतकऱ्यांनाच शक्‍य झाले. इतर शेतकरी अजूनही खतांच्या प्रतीक्षेत आहेत. खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक अडचणी असताना आता युरियाची अडचण आल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

महिन्याभरात 50 टक्के युरिया

जिल्ह्यात युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत आवक कमी होती. त्यामुळे खताचा प्रश्‍न गुंतागुंतीचा होण्याची शक्‍यता होती. आतापर्यंत जिल्ह्यात 40 हजार मेट्रिक टन युरिया आला आहे. यातील जवळपास 25 हजार मेट्रिक टन युरिया हा 10 जुलै ते आजपर्यंत आला आहे. सध्या तूट 17 हजार मेट्रिक टनाची आहे. एव्हढी मोठी तूट भरून काढणे आताच शक्‍य दिसत नाही. या आठवड्यात आणखी रॅक लागण्याची शक्‍यता आहे. मात्र, यातील किती खत जिल्ह्याच्या वाट्याला येणार, यावरच शेतकऱ्यांचे नियोजन अवलंबून आहे.

तोडगा काढा : शेतकऱ्याने चक्क आमदारांचीच तहसीलदारांकडे केली तक्रार, वाचा काय आहे प्रकार

कृषिमंत्र्यांच्या आश्‍वासनाची आठवण

महिन्याभऱ्यापूर्वी कृषिमंत्री दादा भुसे यवतमाळ जिल्ह्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील कृषीविषयक बाबींचा आढावा घेताना युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान, कृषिमंत्री भुसे यांनी ही तूट भरून काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. सध्या युरिया येण्याचे प्रमाण वाढले असले तरी तूट भरून निघालेली नाही. त्यामुळे त्यांचे आश्वासन कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top