शेतकरी झाले हवालदिल; वादळी पावसानंतर वन्यजीवांचा हैदोस

नीलेश झाडे
Sunday, 4 October 2020

शेतातील पिकात वन्यजीवांचा हैदोस सुरू आहे. या प्रकाराने शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. वन्यजीवांना शेतपिकापासून दूर ठेवण्यासाठी बळीराजा नानाविध उपाययोजना अमलात आणत आहे. मात्र, या उपाययोजना कुचकामी ठरत आहे.

धाबा (जि. चंद्रपूर) : काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसात शेतपिके जमिनीवर लोळली होती. हातात येणाऱ्या पिकांचे नुकसान बघून बळीराजा खचला होता. यातून अद्यापही बळीराजा सावरलेला नाही. अशात आता वन्यजीवांच्या हैदोसाने शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. या दुहेरी संकटाने गोंडपिपरी तालुक्‍यातील बळीराजा हवालदिल झाला आहे.

गोंडपिपरी तालुक्‍यातील काही भागाला चार-पाच दिवसांपूर्वी वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. याचा सर्वाधिक फटका शेतपिकांना बसला होता. तालुक्‍यातील अळेगाव परिसरातील धान, कपाशी आणि मिरचीचे पिके जमिनीवर लोळले. पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काही दिवसांत हातात येणाऱ्या पिकांची अवस्था बघून बळीराजा खचला. या संकटातून बळीराजा अद्यापही सावरलेला नसताना दुसरे संकट कोसळले आहे.

अधिक माहितीसाठी - #SundaySpecial : ‘झणझणीत सावजी मटण’ खाल्ल ना... वाचा मग कसा झाल जन्म

शेतातील पिकात वन्यजीवांचा हैदोस सुरू आहे. या प्रकाराने शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. वन्यजीवांना शेतपिकापासून दूर ठेवण्यासाठी बळीराजा नानाविध उपाययोजना अमलात आणत आहे. मात्र, या उपाययोजना कुचकामी ठरत आहे.

दुसरीकडे नुकसान झालेल्या पिकांच्या तुलनेत वनविभागाकडून मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम तोकडी आहे. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईचा अर्ज वनविभागाकडे करीत नसल्याचे चित्र आहे. शेतपिकावर ओढावलेल्या दुहेरी संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Chandrapur district was hit by a double crisis