#SundaySpecial : ‘झणझणीत सावजी मटण’ खाल्ल का... वाचा मग कसा झाला जन्म

know the story behind spicy sawaji Mutton and chicken read full story
know the story behind spicy sawaji Mutton and chicken read full story

उमरेड (जि. नागपूर) : वऱ्हाडी पाहुणचार म्हणजे अघळपघळ कारभार... खाण्यापिण्याचा शौक करावा तर नागपुरी लोकांनीच... स्वतःदेखील चवीने खाणार व येणाऱ्या प्रत्येकाला खायला देणार... येथील आदरातीथ्य कोणीही विसरू शकत नाही. अशा या नागपूर व्यंजनामधली फेमस डीश म्हणजे ‘सावजी मटण’... भारतात ‘सावजी’ म्हणजे नागपूर अशीच ओळख निर्माण झाली आहे... झणझणीत ‘सावजी’चा जन्म नागपुरातच झाला आहे. या मागे देखील गंमतशीर इतिहास आहे. चला तर जाणून घेऊया इतिहास...

नागपुरातील उमरेड म्हटल की ‘सावजी उमरेड’... सावजी हा शब्द चटकन आपल्या मुखातून बाहेर येतो आणि तोंडाला पाणी सुटते. नागपूर जिल्ह्यातील प्राचीन इतिहास लाभलेले आणि आधुनिक वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख निर्माण केलेले शहर म्हणजे ‘उमरेड’... उमरेड शहराची महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सावजी भोजनालय म्हणून विशिष्ट अशी ओळख निर्माण झालेली आहे.

मुळात ‘सावजी’ हे नाव प्रचलित होण्यामागे फार मोठा रोचक असा इतिहास आहे. नागपूर जिल्ह्यातील हलबा म्हणजेच ‘कोष्टी’ लोकांच्या हाताने बनवलेले ‘चिकन-मटण’ आणि इतर व्यंजन हे सावजी व्यंजन म्हणून प्रसिद्ध आहे. ‘कोष्टी’ लोकांचे मूळ नाव हे ‘हलबा’. अनेक वर्षांआधी हा हलबा (आदिवासी) समाज बस्तरवरून (छत्तीसगड) ‘गोंड’ राजाच्या राज्यात आला. ‘गोंडवन’ येथे म्हणजे आजचे नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये गोंड राजा बख्त बुलंद शहा आणि त्यांचे पुत्र चांद शहा यांच्या शरणात आले. नंतर भोसले राज्याच्या काळापर्यंत हा समाज गोंडवनात म्हणजे तेव्हाच्या ‘भोसले’ राजाच्या राज्यात पुनर्वसित झाला.

या समाजातील स्त्रियांनी बनवलेल्या व्यंजनांना काही वेगळीच चव होती. हाच गुण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी कामात आला. या समाजातील लोकांनी त्यांच्या घरातील खास पदार्थ इतर लोकांना खाऊ घालण्यात सुरुवात केली. आता इतर लोकांच्या तोंडाला त्याची चव लागली होती. इतर लोक त्यांच्याकडे आग्रह करीत ‘का सावकार तोरोयमा जेमला आउ काय’ (म्हणजे तुमच्याकडे जेवायला येऊ काय) असे म्हणू लागले. हळूहळू खवाय्या लोकांची संख्या वाढत गेली. त्यांच्या व्यंजनांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. यानंतर घरीच अस्सल छत्तीसगडी मसाल्यात बनवलेल्या पदार्थांची खानावळ सुरू झाली.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड या गावात पुष्कळ प्रमाणात कोष्टी समाज आहे. इतर सर्व ठिकाणाप्रमाणे उमरेडमध्येपण ‘सावजी भोजनालय’ व्यवसाय म्हणून उदयास आला. लगेच चटकदार व्यंजन अस्सल घरगुती आणि गावराण चवीसाठी उमरेड सावजी भोजनालय प्रसिद्ध होत गेला. उमरेड सावजीची चटकदार गावरान चवमुळे उमरेड सावजी आज ब्रँड म्हणून प्रसिद्धीला आलेला आहे.

हलबा समाजाशिवाय इतर समाजातील लोकांनी या व्यवसायात हात टाकण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु, ‘कोष्टी हलबा’ लोकांच्या घरगुती आणि गोपनीय अशा मसाल्यांच्या चवीमुळे फक्त हलबा लोकांनाच या व्यवसायात यश आले. एक मुद्दा सांगायचा म्हणजे उमरेड सावजीमध्ये ‘गीला-सुका’, ‘तांबडा रसा, लाल-पांढरा रसा’ हा प्रकार पुष्कळ प्रचलित आहे. याचा आस्वाद दूरदुरून आलेले लोक घेतात.

असे पडले कोष्टी नाव

या समाजाला साथ मिळाली शेजारी-पाजारी राहणाऱ्या मुस्लिम विणकर समाजाची. त्या काळात हा मुस्लिम विणकर समाज ‘कोसा’ विणण्याचे काम करीत होते. ही कला हलबा समाजाने त्यांच्याकडून शिकून घेतली आणि फक्त शिकलीच नाहीतर पूर्णपणे आत्मसात केली. पुढच्या काळात स्वतः ‘कोसा’ विनण्याचे काम या समाजाने सुरू केले. यावरूनच त्यांचे नाव ‘कोष्टी’ असे पडले.

सावजी नावाचा इतिहास

हळूहळू हा समाज कामात एवढा परिपूर्ण झाला की नंतरच्या काळात ‘हातमांग’ म्हणजे हाताच्या साह्याने ‘मांगठा’ या यंत्रावर धोतर विणकाम करू लागले. या व्यवसायात त्यांना एवढे यश आले की नंतरच्या काळात हा समाज अत्यंत श्रीमंत झाला. विदर्भात ‘हांडी बाजार’ म्हणजे धोतर जोडीचा व्यापार जोरावर होता. पैशाने धनाढ्य झालेल्या या लोकांनी नंतर ‘सावकारीच्या’ व्यवसायात आपला हात टाकला. लोकांना आर्थिक मदत म्हणून व्याजाने पैसे देत असे. म्हणून या लोकांना मानाने ‘साव’ असे संबोधले जात होते. ‘साव’ म्हणजेच ‘सावजी’ यावरूनच त्यांना ‘कोष्टी’ आणि ‘कोष्टी’चे ‘सावजी’ असे नाव मिळाले.

या प्रसिद्ध व्यक्तींनी चाखली चव

प्रसिद्ध व्यक्तींपैकी राहुल द्रवीड, अनिल कुंबळे, मकरंद अनासपुरे, आमदार बच्चू कडू, सचिन तेंडुलकर आदींनी उमरेड सावलीच्या आस्वाद घेतलेला आहे. एकदा तर खुद्द अभिताभ बच्चन यांनी उमरेड सावजीचा आस्वाद घेतलेला, अशी चर्चा कानावर नेहमी येत असते.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com