सरकारचा घुमजाव! वाचा काय आहे...

नीलेश डोये
शनिवार, 28 डिसेंबर 2019

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या वचननाम्यात सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन दिले होते. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. त्यावेळी कुठलाच आदेश निघाला नव्हता. आज सहकार विभागाकडून कर्जमाफीचा सविस्तर आदेश काढण्यात आला.

नागपूर : दोन लाखांपर्यंत कर्जमाफीच्या घोषणांमुळे पाचपैकी दोन लाख माफ होतील. उर्वरित तीन लाख आपण परत करू अशा विचारात असलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या कर्जमाफीचा आदेश निघाला. त्यानुसार दोन लाखांपर्यंत किंवा आत असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांचे सरसकट दोन लाख माफ करण्याच्या घोषणेवरून सरकारने घुमजाव केल्याचे दिसते.

हे वाचाच - वारे डॉक्टर; युवतीला केली शरीरसुखाची मागणी

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या वचननाम्यात सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन दिले होते. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. त्यावेळी कुठलाच आदेश निघाला नव्हता. आज सहकार विभागाकडून कर्जमाफीचा सविस्तर आदेश काढण्यात आला. आज झालेल्या बैठकीत कर्जमाफीचे निकष ठरविण्यात आले. बैठकीला सहकार विभागाचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. यात निकष निश्‍चित करण्यात आले असून कर्जमाफीचा आदेशही काढण्यात आला. या योजनेला महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, असे नाव देण्यात आले आहे.

यानुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत कर्ज घेतलेल्यांनाच माफीचा लाभ मिळेल. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल व व्याज मिळून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम माफ होईल. दोन लाख रुपयांच्यावर थकबाकी असल्यास त्यांना हा लाभ मिळणार नाही. सहकार विभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशाच्या पाचव्या क्रमांकात हा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट होते. सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांचे सरसकट दोन लाख माफ करण्याच्या घोषणेवरून सरकारने घुमजाव केल्याचे दिसते.

यांना मिळणार नाही लाभ

  • आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार
  • 25 हजारांपेक्षा पगार असलेले शासकीय नोकरदार
  • शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणारे व्यक्ती
  • सहकारी क्षेत्रातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांचे 25 हजार पेक्षा उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही

फडणवीस यांच्या काळातील कर्जमाफी

फडणवीस सरकारनेही 30 जून 2017 पर्यंत कर्ज व व्याजाची रक्कम माफी जाहीर केली होती. माफीसाठी अनेक अटी, शर्ती ठेवण्यात आल्या होता. सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधींना यातून वगळण्यात आले होते. प्रथम सरकारने पाच वर्षापर्यंतच्याच थकबाकीदार शेतकऱ्यांचा समवेश केला होता. त्यानंतर कालावधी 2009 पर्यंतच करण्यात आला होता. त्यांनी दीड लाखापर्यंतची माफी दिली होती. दीड लाखावरील रक्कम एकमुश्‍त भरल्यावर याचा लाभ मिळणार होता.

अनेकजण राहणार वंचित

फडणवीस यांनी दीड लाखापर्यंचे कर्ज माफ केले होते. त्यावरील रक्कम एकमुश्‍त भरल्यावरच याचा लाभ मिळणार होता. पैसे नसल्याने अनेकांना कर्ज काढावे लागले. तर पैसे नसल्याने अनेकांना लाभ मिळाला नाही. यातील अनेक शेतकऱ्यांकडे दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्याची चर्चा आहे. ठाकरे सरकारने दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम थकीत असलेले शेतकरी दोन्ही योजनांच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers' disappointment from the government