भर उन्हात पीककर्जासाठी बळीराजाची कसरत; कागदपत्रे जुळवाजुळवमध्ये निर्माण झाला हा प्रश्‍न

crop loan in sangrampur.jpg
crop loan in sangrampur.jpg

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : पीककर्ज घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना भर उन्हात कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले. यामध्ये स्टॅम्प विक्रेतेकोरे स्टॅम्प देत नसल्याने लिखाई करण्यात जास्त वेळ जात आहे. त्यातच उन्हात लाईनमध्ये उभे असणाऱ्यांना कुठलीही सुविधा नसल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर दिसत आहे. 

किमान लाईनमध्ये उभे असणाऱ्यांना सावली व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याकडे महसूल विभागाने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. पीक कर्ज वितरणात सुरळीतपणा आणण्यासाठी वारंवार प्रशासनाकडून सूचना केल्या जात असल्या तरी कागदपत्रांच्या पुर्तता करण्यात शेतकऱ्यांना कुठलीही सवलत मिळालेली दिसत नाही. मग तो सातबारा उतारा असो की फेरफार नक्कल असो, सर्व प्रकारचे कागदपत्र मिळवण्यासाठी भर उन्हात शेतकऱ्यांना कोरोनाची धास्ती न बाळगता पळापळ करावी लागत आहे.

पीककर्जासाठी फेरफार प्रमाणपत्र केवळ नवीन कर्जदार शेतकऱ्यांना गरजेचा आहे. इतर नियमित अर्थात जुन्या खातेदार शेतकऱ्यांना फेरफार नकलीची गरज नाही. तसेच सातबारा व नमुना आठ अ मध्ये मागील कर्ज प्रकरणानंतर बदल झाला असल्यास फेरफार नक्कम आवश्यक राहील, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. परंतु याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी फेरफार नक्कलसाठी आर्थिक भुर्दंड सहन करीत तहसिल कार्यालयात गर्दी करीत आहेत.

तहसील कार्यालयातील नक्कल विभागासमोर भर उन्हात ताटकळत उभे राहलेले दिसून येत आहेत. यावेळी अनेकांनी मास्क बांधलेला नसतो. गर्दीमुळे सोशल डिसन्स्टचा फज्जा उडत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही तालुक्यात सातबारा घरपोच देण्याची सुविधा जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र ही कागदपत्रे जशी दिली जातात, तशा स्वरुपात फेरफार दिला जावा अशी मागणीही शेतकरी करीत आहेत. 

बँकांकडून सर्वप्रकारची कागदपत्रे देण्याबाबत शेतकऱ्यांना सांगितले जात आहेत. एकही कागद कमी असेल तर प्रकरण स्विकारले जात नाही. दुसरीकडे प्रशासनाकडून कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये असे वारंवार जाहीर केले. तलाठ्यांना विचारणा केली असतात्यांना वरिष्ठांकडून आदेश नसल्याचे सांगत ते हातवर करीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सध्या कुणीही गांभिर्याने लक्ष द्यायला तयार दिसत नाही.

महसूल विभागासोबत चर्चा झाली होती
स्टॅम्प पेपरची विक्री करण्याची सुविधा बँक परिसरात करावी यासाठी महसूल विभागासोबत चर्चा झाली होती. सोबतच स्टॅम्प विक्रेत्यांना बसण्यासाठी बँकेकडून जागाही देण्याबाबत सांगितले होते. यामध्ये गावनिहाय शेतकरी बोलावून गर्दी टाळता आली असती.
- पी. बी. कांबळे, व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com