अरे वा! एसटी बस धावणार, हेअर सलून उघडणार; असा ठरला ‘टाईमटेबल’

st bus and salon in buldana.jpg
st bus and salon in buldana.jpg

बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशभर 31 मे 2020 पर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे. राज्यात राज्य शासनाने रेड झोन व नॉन रेड झोनबाबत आदेश लागू केले आहे. हे सुधारित आदेश जिल्ह्यात 22 ते  31 मे पर्यंत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लागू केले आहेत.

सर्व दुकाने सकाळी 9 ते सायं 5 या वेळेत कंन्टेन्टमेंट झोन वगळता उघडी ठेवण्यास परवानगी आहे. दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान 6 मीटरचे अंतर ठेवावे, तसेच एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घेऊ नये. फिजिकल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनीटायझेशन या अटींसह आंतर जिल्हा बस वाहतुकीस 50 टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी आहे. जिल्ह्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. त्यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात या सेवा सुरू राहणार 
जीवनावश्यक वस्तू विक्री ठिकाणे धान्य व किराणा, बेकरी, फळे व भाजीपाला, कृषी संबंधित सर्व दुकाने, दुधाची दुकाने, पेट्रोल पंप, अंडी, मांस, मच्छी, पशुखाद्य व चारा विक्री दुकाने, रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक, टेलिमेडीसीन्स सुविधा, केमिस्ट, औषधी दुकाने, वैद्यकीय साहित्याचे दुकाने, सर्व आरोग्य सेवा, वैद्यकीय प्रयोगशाळा व संग्रह केंद्रे, पशुवैद्यकीय रुग्णालये, दवाखाने, क्लिनिक, पॅथॉलॉजी, औषधी विक्री व पुरवठा, कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतीविषयक यंत्र व त्यांचे सुटे भाग विक्री दुकाने, दुरुस्ती करणारे दुकाने, शेतीसाठी भाडेतत्त्वावर अवजारे पुरवठा करणारे सेंटर्स, रासायनिक खते, बियाणे, कृषी सेवा केंद्र, गॅस एजन्सी, इमारतींची बांधकामे सुरू राहतील. केशकर्तनालये, स्पा सुरू राहतील. 

लग्न जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीने करता येईल, यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. विवाहात फिजिकल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी राहील. वस्तू व सेवांसाठी ऑनलाइन सुविधांचा वापर व घरपोच डिलीवरी देता येईल. शासनाने ठरवून दिलेल्या किमान अंतरासह महामार्गावरील ट्रक दुरुस्तीचे दुकाने सुरू राहतील. खासगी आस्थापना, कुरिअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी करण्यास परवानगी आहे. इलेक्ट्रीशियन, संगणक अथवा मोबाईल दुरुस्ती, वाहन दुरुस्ती, नळ कारागीर, सुतार यांच्या सेवा सुरू राहतील. नगर पालिका क्षेत्राचे हद्दीबाहेर व ग्रामीण भागातील उद्योग, बांधकामास परवानगी आहे. मॉन्सूनपूर्व संबंधित सर्व कामे सुरू राहतील. त्याचप्रमाणे एका व्यक्तीसह दुचाकी, चालकासह दोन व्यक्तींसाठी थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनांना परवानगी राहील.

या सेवा प्रतिबंधित असणार 
वैद्यकीय कारणा शिवाय किंवा या मार्गदर्शक तत्त्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून इतर व्यक्तींना आंतर जिल्हा व आंतर राज्य संचार करण्यास बंदी, अधिकृत परवानगी शिवाय परराज्यातून जिल्ह्यात व जिल्ह्यातून परराज्यातून प्रवासाच्या वाहतुकीस पूर्णपणे बंदी असेल, सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहील, सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार व तत्सम, व्यायामशाळा व सामूहिक खेळांसाठी क्रीडा कॉम्प्लेक्स बंद राहतील, सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पूजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद राहतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा, मेळावे आदी बंद राहतील. पानटपरी, चहाचे स्टॉल्स, उपाहारगृहे बंद राहतील. तसेच 65 वर्षांवरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, 10 वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील.

कामाच्या ठिकाणी पाळावयाचे नियम 
कामाच्या ठिकाणी हॅण्ड वॉश, सॅनीटायझर, प्रवेश व जाण्याच्या ठिकाणी ठेवावे. तसेच कामाच्या ठिकाणी नियमित सॅनीटायझेशन, नागरिकांच्या प्रवेश ठिकाणी सर्व सुरक्षा बाळगावी. सोशल डिस्टसिंग, चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रुमाल ठेवावा लागणार आहे.

अशी धावणार लालपरी
सकाळी 7 ते संध्याकाळी 7 दरम्यान बुलडाणा आगारातून मलकापूर, मेहकर, जळगाव जामोद, खामगाव व धाड येथे एकूण 21 नियते 136 फेऱ्या, चिखली आगारातून धाड व देऊळगावराजा एकूण 6 नियते 64 फेऱ्या, खामगाव आगारातून शेगाव, बुलडाणा, मेहकर एकूण 7 नियते 92 फेऱ्या, मेहकर आगारातून बुलडाणा, देऊळगावराजा, लोणार एकूण 18 नियते 96 फेऱ्या, मलकापूर आगारातून बुलडाणा एकूण 4 नियते 32 फेऱ्या, जळगाव जामोद आगारातून शेगाव व बुलडाणा एकूण 6 नियते 48 फेऱ्या, शेगाव आगारातून जळगाव जामोद व खामगाव एकूण 6 नियते 84 फेऱ्या होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com