esakal | दुबार पेरणी करूनही सोयाबीन सडलंय, आता चण्याचीही तीच स्थिती; आम्ही जगायचं कसं?
sakal

बोलून बातमी शोधा

farmers facing problem due to double sowing of gram in wardha

तालुक्‍यातील मांडगाव परिसरातील मनगाव, चिंचोली, मेणखात, मांडगाव तसेच लागून असलेल्या हिंगणघाट तालुक्‍यातील कोपरा, बोरगाव, या गावात सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक धोधो पाऊस आला.

दुबार पेरणी करूनही सोयाबीन सडलंय, आता चण्याचीही तीच स्थिती; आम्ही जगायचं कसं?

sakal_logo
By
बादल वानकर

समुद्रपूर (जि.वर्धा): यंदा शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नाहीत. पहिले सोयाबीनने दगा दिला तर आता चण्याचेही तेच हाल असल्याचे दिसून आले आहे. या भागात आलेल्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात चण्याचे बियाणे उगवलेच नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे.  

तालुक्‍यातील मांडगाव परिसरातील मनगाव, चिंचोली, मेणखात, मांडगाव तसेच लागून असलेल्या हिंगणघाट तालुक्‍यातील कोपरा, बोरगाव, या गावात सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक धोधो पाऊस आला. या पावसात येथील शेकडो हेक्‍टरमधील कपाशीचे पीक जमीनदोस्त झाले, तर चण्याची पेरणी उलटली आहे. यापूर्वी या भागातील सोयाबीनची दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली. पण आता चण्याचीसुद्धा दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा - ब्लू मून पाहण्याची शनिवारी संधी, यानंतर तीन वर्षांनी येणार योग

यावर्षी सोयाबीनचा उतारा एकरी 50 किलोपासून 1 क्विंटलपर्यंत आला. पेरणीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही, तरी खचून न जाता शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागला आणि चणा पेरणीसाठी शेत तयार केले. गेल्या आठ दिवसांपासून चणा पेरणी सुरू झाली. चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न पाहत असताना आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्व स्वप्न धुळीस मिळाले आहे. आता दुबार पेरणीसाठी लागणारे बियाणे कोठून आणावे या चिंतेत शेतकरी आहे. 

सततच्या पावसाने यावर्षी सोयाबीन गेले. कपाशी घरी आली नाही. अशातच चण्याची पेरणी गेली. आता शासनाच्या आधाराची गरज आहे. सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी
- विजय वाणी, शेतकरी मनगाव

हेही वाचा - वाघोबा पुढ्यात, शेतकरी मचाणावर ! काय घडले असेल तेव्हा...

आधीच एकरी एक पोते सोयाबीन झाल्याने आम्ही संकटात होतो. त्यात काल झालेल्या पावसाने माझी 16 एकर चणा पेरणी उलटली. तसेच 10 एकर कापूस जमीनदोस्त झाला. आता काय करावे? हा प्रश्न आहे. बियाण्याचे भाव अतोनात वाढून आहे. प्रशासनाने अजून सोयाबीनच्या नापिकीची मदतही दिली नाही. 
- हेमंत पाहुणे, शेतकरी मांडगाव

loading image