esakal | भुईमुग लागवडीचा खर्चही पाण्यात, पीक पिवळे पडल्याने शेतकरी संकटात

बोलून बातमी शोधा

groundnut
भुईमुग लागवडीचा खर्चही पाण्यात, पीक पिवळे पडल्याने शेतकरी संकटात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात यंदा अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुग पिकाची लागवड केली. भुईमुग पीक पिवळे पडले असून, शेंगा धरल्या नाहीत, असे चित्र जिल्हाभरातील आहे. शेकडो हेक्‍टरवरील भुईमूग पीक मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी पेरणी व मशागतीचा खर्च केला. मात्र, यातही शेतकऱ्यांचे हात रिकामेच राहिले आहेत. लागवडखर्च पाण्यात गेला असून, शेतकरी पुन्हा नवीन संकटात सापडले आहेत.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

कोरोना संकटासोबतच शेतकऱ्यांना नापिकीसोबतही दोन हात करावे लागत आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात कपाशी, तूर, सोयाबीन पिकाने पुरता दगा दिला. घामाचे सिंचन केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. बोगस बियाण्याच्या तब्बल 12 हजार शेतकरी कृषी विभागाकडे करण्यात आल्या. मात्र, त्या तक्रारीतून काहीच साध्य न झाल्याने शेतकरी निराश झाले. या निराशेवर मात करून झाले गेले विसरून शेतकरी रब्बी हंगामात राबले. त्यातही फटका बसला. सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळपास पाच हजार हेक्‍टरवर भुईमूगाचा पेरा केला. अनेक ठिकाणी पीक पिवळे पडले असून, शेंगाही लागल्या नाहीत. बोगस बियाणे की, आणखी काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी नुकसानाच्या दारात उभे असताना, कृषी विभागासह विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बांधावर येऊन साधी पाहणीदेखील केली नाही, असा आरोप शेतकरी करीत आहेत. महागाव तालुक्‍यातील वागद येथील दिगंबर देवकर व उत्तम देवकर या दोघांनी सात एकर क्षेत्रात सव्वालाख रुपये खर्च करून भुईमूग लागवड केली. या कालावधीत ते घरीदेखील गेले नाहीत. मात्र, आता पिकाची अवस्था बघून त्यांचे अवसान गळून गेले आहे. ही स्थिती जिल्हाभरातील भुईमूक उत्पादक शेतकऱ्यांची आहे. जीवन मरणाच्या चक्रव्यूहात शेतकरी सापडले आहेत. पीक हातात येण्याची शक्‍यता मावळल्याने शेतकऱ्यांनी पिकांत जनावरे सोडली आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी महसूल, कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

शेतकरी नापिकीवर मात करून शेतात राबत असताना निसर्ग साथ देत नाही. महागाव तालुक्‍यासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूगाची लागवड केली. मात्र, बियाणे वांझ निघाल्याने शेंगा लागल्या नाहीत. अजून कुणीही दखल घेतली नाही. कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करता आली नाही. आंदोलनाचा पवित्राही कायम आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी.
- मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.