...तरीही फुलवली ‘एचटीबीटी’!

Cotton farm.jpeg
Cotton farm.jpeg

अकोला : पर्यावरण सुरक्षेचे कारण देत ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यावर शासनाने बंदी आणली आहे. मात्र, शासनाच्या विरोधाला न जुमानता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात ‘किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह’ चळवळ उभारून आणि ‘जैव क्रांती’ करत शेतकऱ्यांनी एचटीबीटी फुलवली आहे.


जीएम तंत्रज्ञान युक्त बियाणे वापरणाऱ्या देशातील शेतकऱ्यांना रोग, कीड अशा जैविक आपत्ती आणि क्षार, अतिवृष्टी, अवर्षणसारख्या अजैविक आपत्तीपासून कमी खर्चात संरक्षण होत आहे. त्यामुळे त्यांचा एकरी खर्च कमी होत आहे आणि उत्पादन जास्त मिळत आहे. परंतु, भारतीय शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरण्यास सरकारने बंदी घातली असून, त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांची स्पर्धा क्षमता कमी झाल्याचे जाहीर करत, शेतकरी संघटनेने बंदी घातलेल्या एचटीबीटी बियाण्याची पेरणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. या आवाहनातून आणि संघटनेच्या नेतृत्त्वात 10 जून 2019 रोजी अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्यातील अकोली जहांगीर येथे, ‘किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह’ चळवळ उभारून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बंदी घातलेल्या एचटीबीटी कापूस बियाण्याची लागवड करण्यात आली. त्या नंतर सतत पाच दिवस तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. येथे हे आंदोलन शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात आले. बंदी झुगारुन आणि शासनाला पूर्व सूचना देऊन येथील शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापसाच्या वाणाची लागवड केली. यावर कारवाई करत शासनाने अकोट व हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये 16 शेतकऱ्यावर गुन्हे सुद्धा नोंदविले. परंतु, एचटीबीटी तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या हिताचेच असून, त्यासाठी शासनाने स्वातंत्र बहाल करावे, अशी घोषणा देत शुक्रवारी (ता.3) अडगाव बु. येथे एचटीबीटी कापूस लागवड करणारे, शेतकरी लक्ष्मीकांत कौठकर यांचे शेतावर ‘जैव क्रांती’ शिवार फेरीचे शेतकरी संघटनेने आयोजन केले. यावेळी विदर्भातून विविध जिल्ह्यातील उपस्थित शेकडो शेतकऱ्यांना एचटीबीटी कापसाचे तुलनात्मक स्वरुप दाखविण्यात आले. शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ता ललित बाहाळे, सोशल मीडिया राज्य प्रमुख विलास ताथोड, तंत्रज्ञान आघाडीचे अकोला जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

तंत्रज्ञान स्वातंत्र्य दिले तर शेतकऱ्यांचा ‘जय’
तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना आणि शेतकऱ्यांना उद्देशून ‘जय जवान जय किसान’ असा नारा दिला होता. तो आता प्रत्येकाच्या मुखात आहे. परंतु, शेतकऱ्यांचा खरा जय तेव्हाच होईल, जेव्हा त्याला जैव तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल आणि त्याचा वापर करण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ता ललित बाहाळे यांनी शिवार फेरीमध्ये मनोगत व्यक्त करताना केले.

आता ‘बीटी ब्रींजॉल’ पेरू
‘जैव क्रांती’ करत शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात शासनाने बंदी घातलेले एचटीबीटी कापूस बियाण्याची पेरणी करण्यात आली. पुढे जैविक तंत्रज्ञानातून निर्मित इतर पिकेही देशात घेऊ आणि या चळवळीचा भाग म्हणून लवकरच या तंत्रज्ञानातून निर्मित ‘बीटी ब्रींजॉल’ वांग्याची पेरणी करण्यात येणार असल्याचे, ललीत बाहाळे यांनी यावेळी जाहीर केले.

फवारणी, निंदणीचा खर्च वाचतो
उत्पादनाच्या बाबतीत एचटीबीटी आणि बीटी कापूस वाण सारखेच दिसत आहे. परंतु, एचटीबीटी कापूस पिकात बीटीच्या तूलनेत तण अत्यल्प असून, कीडीचा प्रादूर्भाव दिसत नाही. त्यामुळे एचटीबीटी वाणासाठी फवारणी, निंदणीचा मोठा खर्च वाचतो हे पटले आहे. त्यामुळे बियाणे उपलब्ध झाल्यास एचटीबीटी निश्चित पेरू.
- नंदकिशोर गावंडे, कापूस उत्पादक शेतकरी, जानोरी (ता.शेगाव)

उत्पादन सारखेच
बीटी सोबत तुलना केल्यास बोंडाची संख्या सारखीच आहे त्यामुळे उत्पादनही सारखेच मिळेल. परंतु, एचटीबीटी मध्ये तीव्र तणनाशकाची फवारणी करता येते ही जमेची बाजू आहे. बीटी मध्ये मात्र ही फवारणी केल्यास पीक नष्ट होते. त्यामुळे एचटीबीटी निश्चितच शेतकऱ्याचा खर्च कमी करेल.
- सुनील बोरसे, कापूस उत्पादक शेतकरी, देवधाबा (ता.मलकापूर)

रविवारी तंत्रज्ञान स्वातंत्र्य महोत्सव
महाराष्ट्रातील बीज सत्याग्रहात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडून त्यांचे एचटीबीटी कपाशीचे अनुभव ऐकण्यासाठी व तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी, यवतमाळ जिल्ह्यात हिवरी येथे रविवारी (ता.5) तंत्रज्ञान स्वातंत्र्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांना उपस्थितीत राहावे, असे आवाहन ललीत बाहाळे यांनी यावेळी केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com