...त्या शेतकऱ्यांचेही सावकारी कर्ज होणार माफ!

अनुप ताले
रविवार, 8 डिसेंबर 2019

  • शेतकऱ्यांसाठी सावकारी कर्जमाफी योजना
  • सावकारांच्या परवाण्यात नमूद क्षेत्राबाहेरील कर्जधारकही पात्र
  • मंत्रीमंडळाच्या नव्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू
  • जिल्हा उपनिबंधकाद्वारे शेतकऱ्यांकडून अर्जाची मागणी

अकोला : सावकारांनी त्यांच्या परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेले कर्जही आता माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 38 हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार असून, त्यांनी सावकरांकडून घेतलेले 37 कोटी रुपयांचे कर्ज माफ होऊ शकते.

विदर्भ, मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबर 2014 पूर्वी परवानाधारक शेतकऱ्यांकडून कर्ज घेतले होते, त्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने 10 एप्रिल 2015 रोजी जाहीर केला होता. मात्र या योजनेमध्ये परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस दिलेले कर्ज माफ होणार नाही, अशी अट असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील केवळ 49 शेतकऱ्यांचे तीन लाख 96 हजार रुपये एवढेच कर्ज माफीसाठी पात्र ठरले होते. परंतु, मंत्रीमंडळाच्या बैठकीत, सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेली कर्जेही माफ करण्याबाबत नव्याने निर्णय झाल्यामुळे, योजनेच्या लाभापासून वंचित राहालेले अकोला जिल्ह्यातील 38 हजार 570 शेतकरी सुद्धा, कर्जमाफीसाठी पात्र ठरणार असून, त्यांनी सावकारांकडून घेतलेले 37 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. या निर्णयाची अंबलबजावणी प्रशासनाद्वारे आता सुरू केली असून, सावकारी कर्जमाफीसाठी अर्ज भरून देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांना केली आहे.

38 हजार शेतकरी होते वंचीत
अकोला जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना या सावकारी कर्जमाफीचा लाभ घेता न आल्यामुळे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. तत्कालीन 196 सावकारांनी जिल्ह्यामध्ये कर्ज वाटप केलेल्या बहुसंख्य प्रकरणात, लाभार्थी हे सावकारी परवान्यावरील नोंद केलेल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील होते. त्यामुळे या सावकारी कर्जमाफीचा लाभ अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकला नव्हता. आता सदर अट रद्द करण्यात आल्याने, जिल्ह्यातील 342 गावांमधील सुमारे 38 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत.
- डॉ.प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला

येथे अर्ज उपलब्ध
जिल्ह्यातील 412 सेवा सहकारी संस्था, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोलाच्या सर्व शाखा, 7 कृषी उत्पन्न बाजार समित्या, 7 खरेदी विक्री सहकारी संस्था, 7 बलुतेदार सहकारी संस्था, 47 नागरी बिगर कृषी सहकारी पत संस्था, 154 कर्मचारी सहकारी पतसंस्था, 69 सुशिक्षीत बेरोजगार सहकारी संस्था, 84 गृहनिर्माण सहकारी संस्था, 57 मत्स्य सहकारी संस्था, 30 दुग्ध सहकारी संस्था, 5 विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार यांचेकडे सावकारी कर्ज माफी योजनेंतर्गत अर्ज उपलब्ध आहेत.

यांचेकडे करावा अर्ज
सेवा सोसायटीचे गट सचिव, सहा.सचिव, लिपीक, संबंधित परवाणाधारक सावकार, तालुक्याचे उपनिबंधक, सहाय्यक निबंधक यांचेकडे सावकारी कर्जमाफी बाबतचे अर्ज सादर करता येणार असल्याचे, जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers' loan from lender will be forgiven

फोटो गॅलरी