esakal | राब राब राबणारा शेतकरी का जातो खासगी व्यापाऱ्यांकडे...हे आहे कारण...वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

नवेगावबांध : येथील उपबाजार समितीत काही दिवसांपूर्वी मोजणीच्या प्रतीक्षेत असलेले धान.

हाती आलेल्या पिकाची विक्री करण्याकरिता शेतकरी धान केंद्रावर नेत आहेत. मात्र, काही ठिकाणी केंद्र बंद तर, काही ठिकाणी कोणते ना कोणते कारण सांगून मोजणी होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, पैसा हाती राहावा, म्हणून शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत.

राब राब राबणारा शेतकरी का जातो खासगी व्यापाऱ्यांकडे...हे आहे कारण...वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : जिल्ह्यात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात धानपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. नुकताच रब्बी हंगाम आटोपला आहे. कित्येक शेतकऱ्यांनी धानाची मळणीही आटोपली. परंतु, बहुतांश ठिकाणी धान खरेदी केंद्र उशिरा सुरू झालीत. काही ठिकाणी झालीच नाहीत, जी केंद्रे सुरू झालीत, त्या केंद्रावर वेळेत धानाची मोजणी केली जात नाही.

त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्रस्त शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. आर्थिक पिळवणूक होत असली; तरी हातात पैसा राहावा, या हेतूने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे जावे लागत आहे.

जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रब्बी हंगामात धानपिकाचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सिंचनाच्या सोयी पुरेशा असल्याने खरिपातील तूट रब्बी हंगामात भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, यंदा या हंगामात शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड केली. मध्यंतरी पेरवा, करपा, खोडकिडा अशा रोगांनी पिकांवर आक्रमण केले.

कसेबसे जगवले धानपीक

औषधी फवारणी करून कसेबसे धानपीक जागविले. मात्र, कधीही अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने चिंता वाढली; तरीही शेतकऱ्यांनी आस सोडली नाही. हाती आलेल्या पिकाची विक्री करण्याकरिता शेतकरी धान केंद्रावर नेत आहेत. मात्र, काही ठिकाणी केंद्र बंद तर, काही ठिकाणी कोणते ना कोणते कारण सांगून मोजणी होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, पैसा हाती राहावा, म्हणून शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत.

जाणून घ्या : काय हे नशीब! 24 तासांत दिसले त्यांना 35 वाघ अन्‌ 40 बिबट

उघड्यावरील धान भिजले

कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगावच्या उपबाजार नवेगावबांध येथील शासकीय आधारभूत केंद्रावर 6 मेपर्यंत जवळपास 550 क्विंटल धान 13 ते 15 शेतकऱ्यांनी विक्रीकरिता आणले. 2 तारखेपासून या ठिकाणी धानाची आवक झाली आहे. परंतु, या कालावधीत धान खरेदी केंद्र सुरू नव्हते. 6 मे रोजी नवेगावबांध येथे 4.30 च्या सुमारास अचानक पाऊस आला. त्यात उघड्यावर पडून असलेले धान पावसाने ओले झाले. याचा फटकाही शेतकऱ्यांना बसला. असाच प्रकार जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यात आहे. त्यामुळे शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या दारात जात आहे. दरम्यान, धानाची मोजणी त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा : मोबाईलने केले सर्वसामान्यांच्या "कॉइन बॉक्‍स'ला हद्दपार...वाचादैनंदिन गरजा भागविण्यासाठी धान विकले
धान खरेदी केंद्र उशिरा सुरू झाले. लॉकडाउनच्या या कालावधीत दैनंदिन गरजा भागविण्यासाठी धान खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागले.
- देवचंद पटले, अल्पभूधारक शेतकरी, पांढरी.

खरेदी केंद्र वेळेवर सुरू झाले नाही
धान खरेदी केंद्राचे पांढरी येथील बहुतेक गोदाम लॉकडाउनमुळे रिकामे झाले नव्हते. वेळेवर केंद्र सुरू न झाल्याने धान व्यापाऱ्यांना द्यावा लागला.
- आनंद गायधने, शेतकरी, सीतेपार.

loading image