कापसाला बाजारात कमी भाव; सोयाबीन, धानाला जास्त; शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडे धाव

टीम ई सकाळ
Saturday, 9 January 2021

सरकारने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करताना एकरी ९ क्विंटल ६० किलो एवढीच मर्यादा आखून दिली आहे. त्यामुळे उरलेल्या धानाचे काय करायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना सतावत आहे. वाढलेली मजुरी, खते, बियाणे, कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आदी जोडल्यास त्याच्या पदरी फारसे काही पडत नाही.

नागपूर : शेतमालाचा हमीभाव निश्चित करण्याच्या प्रक्रियेबाबत वाद आहे. तो पुरेसा नाही, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे जाहीर हमीभावापेक्षा अधिक भाव जो देईल त्यांना माल विकण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असतात. विदर्भात सर्वत्र खासगी व्यापारी हमीभावाएवढा वा त्यापेक्षा अधिक भाव देऊन सोयाबीन, धान शेतकऱ्यांकडून विकत घेत आहेत. मात्र, कापूस हमीभावापेक्षाही कमी भावात विकत घेतला जात आहे. पिकावरील कीडीचे आक्रमण व परतीच्या पावसाचा प्रकोप यामुळे उत्पादनात घट झाली असल्याने खर्च निघेल काय, या चिंतेत शेतकरी आहेत.

शेतमाल बाजारात आला त्यावेळी अनेक ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रेच सुरू झाली नव्हती. त्याचा फायदा घेऊन खासगी व्यापाऱ्यांनीही भाव पाडले व पडत्या भावात माल खरेदी केला. मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीनचा बराच माल विकल्यानंतर व्यापाऱ्यांनी भाव वाढवले. सध्या काही प्रमाणात खुल्या बाजारात भाव अधिक असला तरी मालाची आवक कमी आहे.

सविस्तर वाचा -  'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरीत शोककळा; सरपंचांनाही अश्रू अनावर

शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीपासून पिकांचे व्यवस्थापन केले. रोगांपासून संरक्षण करण्यासाठी महागड्या औषधांचा वापर केला. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक तर बुडालेच पण कपाशीच्या फुलपात्या गळून व बोंडे सडलीत. पाणी साचत असलेल्या जमिनीच्या कपाशीवर लाल्या रोग दिसून आला. यातून सावरण्यासाठी कपाशीची झाडे जगवायला शेतकऱ्यांनी महागड्या औषधांच्या फवारण्या केल्यात परंतु तालुक्यात बोंडअळी, फुलकिडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला.

कुठे एक तर कुठे दोनच वेच्यात कापूस उलंगला. अतिपावसामुळे उत्पादनासोबतच प्रतवारीही घसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. सोयाबीनवर ऐन बहरात असतानाच खोडकीडेचे आक्रमण झाले. त्यात परतीच्या पावसाचा आणखी फटका बसला. धानपिकाचेही मावा, तुडतुडा कीडीने नुकसान केले. त्यामुळे कापूस, सोयाबीन व धान उत्पादनात चांगलीच घट झाली.

क्लिक करा - धक्कादायक वास्तव! नागपुरी संत्रा उत्पादनात पिछाडला; महाराष्ट्राची दहाव्या स्थानी घसरण

सरकारने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करताना एकरी ९ क्विंटल ६० किलो एवढीच मर्यादा आखून दिली आहे. त्यामुळे उरलेल्या धानाचे काय करायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना सतावत आहे. वाढलेली मजुरी, खते, बियाणे, कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आदी जोडल्यास त्याच्या पदरी फारसे काही पडत नाही. परिणामी, शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना मातीमोल भावाने धान विकत आहे. 

धानाला सर्वाधिक भाव

यावर्षी शासनाने सर्वसाधारण धानाला प्रतिक्विंटल १८६८ रुपये हमीभाव घोषित केला असून, ‘अ’ दर्जाच्या धानाला प्रतिक्विंटल १८८८ रुपये भाव आहे. तसेच राज्य सरकारने प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धानाला कमीतकमी प्रतिक्विंटल २५६८ रुपये मिळत आहेत. हा आतापर्यंतचा धानाचा सर्वाधिक भाव आहे. 

... तोवर शेतकरी सुखी होऊ शकत नाही
उत्पादन खर्चावर आधारित भाव जोवर मिळत नाही, तोवर शेतकरी सुखी होऊ शकत नाही. आजचा हमीभाव हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने त्याचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. शिवाय हमीभावाने खरेदी न करणाऱ्यांवर कडक कारवाई करणाऱ्या कायद्याची गरज आहे. 
- रविकांत तुपकर,
स्वाभिमानी शेतकरी संघटना

अधिक वाचा - Video : चार एकर शेतीतून ३० क्विंटल तुरीचे उत्पन्न; परिश्रमाला उन्नतीचे फळ

शेतकरी नागवला जात आहे
शासनाने १९६७ पासून हमीभाव संकल्पना अंमलात आणली आहे. हमीभाव म्हणजेच सर्वात कमी भाव. तो शेतकऱ्यांना कधीच मिळत नाही. मिळाला तर दोनदोन वर्ष पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी नागवला जात आहे. 
- गजानन आमदाबादकर,
शेतकरी नेता, कारंजा

हमीभाव 

  • कापूस : ५८००-५९०० 
  • सोयाबीन : ३८००-३९०० 
  • धान : १८००-१९०० 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers run to traders to sell farm produce Farmers marathi news