'शेतकऱ्यांनो, आत्महत्या हा उपाय नव्हे, व्यवस्था व निसर्गाशी लढा'

शब्बीर खान
Friday, 26 June 2020

निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने सोयाबीन बियाणे उगवले नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. अशीच तक्रार तालुक्‍यातील कृष्णापूर येथील शेतकरी नीलेश झामरी यांची आहे.

बाभूळगाव (जि. यवतमाळ) : 'पाच एकरांत पेरलेले सोयाबीन उगवले नाही. दुबार पेरणीचे संकट ओढवले. दुबार पेरणीसाठी पैसा नाही. मनात सातत्याने आत्महत्येचा विचार येतो आहे', असे आर्जव तालुक्‍यातील कृष्णापूर येथील नीलेश झामरे या शेतकऱ्याने शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्याकडे सोशल मीडियातून केले. मात्र, याबाबत जेव्हा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना कळले, त्यांनी तातडीने गुरुवारी (ता. 25) सकाळी नऊ वाजता त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्याला वैयक्तिक मदत देत धीर दिला. आत्महत्या हा उपाय नसून शासन, व्यवस्था व निसर्गाशी लढण्याचा मंत्रही दिला.

गेल्या वर्षी कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात झाले. मात्र, शासन कापूस खरेदी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल केला. परिणामी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला. परंतु, निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने सोयाबीन बियाणे उगवले नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. अशीच तक्रार तालुक्‍यातील कृष्णापूर येथील शेतकरी नीलेश झामरी यांची आहे.

नातेच उठले जीवावर, शेतीच्या वादातून नातवानेच केली आजीची हत्या

शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शेतकऱ्यांना आपल्या समस्या, प्रश्‍न व्हॉट्‌असअपवरून कळविण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शेतकरी नीलेश झामरे यांनीही आपली व्यथा मांडली. त्यांनी सोयाबीन निघाले नसून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दुबार पेरणीसाठी पैसा नाही. मनात सातत्याने आत्महत्येचे विचार येत आहेत. मला मदत करा, असे आवाहन केले होते. मात्र, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी निर्माण झालेल्या शेतकरी मिशनने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. उलट त्या शेतकऱ्याला आमदाराला सांगा, अधिकाऱ्यांना भेटा, असे मोघम सल्ले देऊन त्या शेतकऱ्याची पोस्ट सार्वजनिक केली.

ही बाब जेव्हा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना समजली, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता जोपासत दुसऱ्याच दिवशी कृष्णापूर हे गाव गाठले. यावेळी त्यांच्यासोबत बाभूळगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश मानलवार होते. त्यांनी नीलेश झामरे या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या शेतात गेले. नीलेश झामरे या तरुण शेतकऱ्याकडे आठ एकर शेतजमीन आहे. पाच एकर त्यांनी सोयाबीन, तर तीन एकरांत कपाशी लावली. कपाशी निघाली मात्र सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले. आमदार डॉ. उईके यांनी शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेत त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. तसेच या परिसरात धम्मपाल ढोके व दिलीप भानसे यांच्याही शेतांची पाहणी केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सतीश मानलवार, ग्रामपंचायत सदस्य सदस्य मिलिंद पडोळे, दिलीप डाखोरे, अरविंद गेडेकार आदी उपस्थित होते.

पेट्रोल-डिझेलचे दर दोनशे रुपये लिटर करा, कोणी केली ही मागणी...

शेतकऱ्यांची तक्रारीची दखल घ्या

सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्य शासनाने हेक्‍टरी दहा हजारांची मदत द्यावी, अशी मागणी करणार आहोत. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दाखवून त्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी.
प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार, राळेगाव विधानसभा मतदारसंघ.

तालुका कृषी कार्यालयात तक्रारींचा खच

शेतात टाकलेले सोयाबीनचे बियाणे अंकुरले नसल्याने तालुका कृषी कार्यालयात तक्रारीचे अर्ज मोठ्या संख्येत येत आहेत. तालुक्‍यातील झपाटखेडा, गळव्हा, सावर, चिमणापूर, दाभा, आसेगाव देवी, तरोडा, नांदुरा (खु.), एरणगाव, पाचखेड, गवंडी, घारफळ, सौजना, गोंधळी, कृष्णापूर आदी गावांतूनही तक्रारी आलेल्या आहे. मंडळ कृषी अधिकारी व शेतीविषयक शास्त्रज्ञ यांनी संबंधित शेतशिवारातील पाहणीला सुरुवात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Suicide is not solution