आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांचा हळद पीक लागवडीकडे कल; सोयाबीनचा फटका

सूरज पाटील
Saturday, 17 October 2020

पहिल्याच वर्षी चांगला नफा मिळाल्याने जून महिन्यात पुन्हा लागवड केली. शेख साबीर यांच्या शेताच्या बाजूलाच विलास काळे यांचे शेत आहे. त्यांनी कापूस लावला. २२ हजार रुपयांचा खर्च करून केवळ एक क्विंटल कापूस निघाला. त्यामुळे पुढील वर्षी सोयाबीन, कपाशी मागे न लागता हळद लागवड करणार असल्याचे सांगितले.

यवतमाळ : नापिकी व कर्जबाजारीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा खरीप हंगाम सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरला. अस्मानी व सुल्तानी संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पळविला. सोयाबीन पिकातून लागवड खर्च निघाला नाही. त्यामुळे आता पारंपरिक पेऱ्यात बदल करून हळद लागवड करण्याकडे यवतमाळ तालुक्‍यातील वाई येथील शेतकऱ्यांचा कल आहे.

शेख साबीर हे वाई येथील शेतकरी. इतर शेतकऱ्यांप्रमाणेच कापूस व सोयाबीनचे पीक घेत होते. वारंवार नापिकीचा सामना करावा लागल्याने कर्जाचा डोंगर वाढला. दरम्यान, त्यांनी महागाव तालुक्‍यात भेट दिली असता तेथील शेतकरी हळद पीक उत्तमप्रकारे घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपणही या पिकाकडे वळावे, असा विचार करून ३० क्विंटल बेन आणून लागवड केली.

ठळक बातमी - पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा

पहिल्याच वर्षी चांगला नफा मिळाल्याने जून महिन्यात पुन्हा लागवड केली. शेख साबीर यांच्या शेताच्या बाजूलाच विलास काळे यांचे शेत आहे. त्यांनी कापूस लावला. २२ हजार रुपयांचा खर्च करून केवळ एक क्विंटल कापूस निघाला. त्यामुळे पुढील वर्षी सोयाबीन, कपाशी मागे न लागता हळद लागवड करणार असल्याचे सांगितले.

एका शेतकऱ्याने सात एकरात सोयाबीनची लागवड केली. दुबार पेरणी, निंदणी, फवारणी, खत असा एकूण ३० हजार रुपयांचा खर्च करून हातात काहीच पीक आले नाही. पावसामुळे पिकाला फटका बसला. आता सोयाबीन व कापूस पिकाकडे न लागता हळद लागवड करण्याचा निश्‍चय केला आहे. नापिकी व कर्जाच्या संकटातून बाहेर निघत आर्थिक वाटा समृद्घ करण्यासाठी शेतकरी नवीन पिकाचा आधार घेत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, आलेल्या संकटावर मात करून त्याची तयारी आतापासूनच करीत आहेत.

हेही वाचा - अरे व्वा... नागपूरहून वर्धा, चंद्रपूरला पोहचता येणार चाळीस मिनिटांत

वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी होत नाही
पूर्वी सोयाबीन व कपाशीचे पीक लागवड करीत होतो. मागील वर्षी पीकात बदल करून हळद लागवड केली. यंदा जून महिन्यात तीन एकरात हळद लागवड केली आहे. पीक चांगले आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी होत नाही. नफादेखील चांगला मिळतो. इतरही शेतकरी या पिकाकडे वळल्यास फायदाच होणार आहे.
- शेख साबीर,
हळद उत्पादक, शेतकरी

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers tend to cultivate turmeric