प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान, पण मुहूर्त कधी?

दीपक फुलबांधे
Monday, 4 January 2021

नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली होती. मात्र, या योजनेत दोन लाख रुपयांच्या आतील थकबाकीदार शेतकऱ्यांना पात्र धरले.

सिहोरा (जि. भंडारा ) :  राज्यातील महा विकासआघाडी सरकारने जूनअखेर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. आज जवळपास पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटूनसुद्धा शासनाकडून प्रामाणिक शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतला नाही. हे प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी शासन मुहूर्त कधी काढणार? असा सवाल संतप्त शेतकरीवर्गाकडून विचारला जात आहे. 

हेही वाचा - खाद्य तेलासह तांदळाचे भाव भिडले गगनाला; दोन-तीन महिन्यापर्यंत दरवाढ राहणार कायम

नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली होती. मात्र, या योजनेत दोन लाख रुपयांच्या आतील थकबाकीदार शेतकऱ्यांना पात्र धरले. परंतु, या कर्जमाफीमध्ये प्रमाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला नव्हता. त्यामुळे प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याने या विरोधात अनेकदा शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामध्ये प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळावे, दोन लाख रुपयांच्या वरील थकबाकीदार शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफी मिळावी, अशा प्रामुख्याने मागण्या केल्या होत्या.

हेही वाचा - विधानभवन आता वर्षभर गजबजणार, उपसचिव दर्जाचे अधिकारी...

पाच महिने लोटले -
प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे शासनाने मान्य करून प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावरील कर्ज 30 जून अखेरपर्यंत भरावे असे सांगितले होते. शेतकऱ्यांनी हे कर्ज भरून आता पाच ते सहा महिन्यांचा  कालावधी उलटला आहे. मात्र, शासनाकडून याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. हा या शेतकऱ्यांवर अन्याय आहे. राज्य शासनाने हे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे युवा नेते किशोर रहांगडाले व शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा - नव्या काँग्रेस प्रदेशाध्यपदासाठी नावाची चर्चा रंगताच नाना पटोलेंनी दिले सूचक उत्तर

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन लाखांवरील रक्कम भरल्यानंतर दोन लाखापर्यंतची रक्कम माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच दोन लाखांच्या आत कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्यानंतर जुलै 2020 अखेर त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. चार महिन्यांपूर्वी आधार प्रमाणीकरण करूनसुद्धा काही शेतकऱ्यांना खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही. यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. 
- सुभाष बोरकर, तालुकाध्यक्ष, भाजप किसान आघाडी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers who paid loan still not receive incentives in sihora of bhandara