काळ्या मातीत मातीत तिफन चालते, लोकबिरादरी प्रकल्पाचा कुपोषणाविरुद्ध एल्गार

मिलिंद उमरे
Tuesday, 11 August 2020

या प्रकल्पाअंतर्गत १८ ते ३० या वयोगटातील तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या तरुण शेतकऱ्यांना या प्रकल्पात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी प्रकल्पाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भामरागड (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याला अनेक वर्षांपासून कुपोषणाच्या अजगराने विळखा घातला असून त्यातून जिल्ह्याची सोडवणूक करण्यासाठी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाने या कुपोषाणाविरुद्धच एल्गार पुकारला आहे. त्यासाठी पारंपरिक धान्यावर संशोधन व लागवडीचा प्रयोग करत जिंजगाव येथे या नव्या प्रयोगाला सुरुवात झाली आहे.

जागतिक आदिवासीदिनानिमित्त रविवार (ता. ९) आदिवासी खाद्य संस्कृती जोपासण्याच्या हेतूने लोकबिरादारी प्रकल्पाने या नवीन प्रयोगाचा प्रारंभ केला. अमाप कष्ट आणि पैसा ओतून भामरागडचे शेतकरी धान पिकवत आहेत. पण अनेक अडचणी आणि बाजार भाव फार नसल्याने हवा तसा नफा मिळत नाही. परिणामी दारिद्य्र आणि कुपोषण त्यांच्या नशिबी येते. म्हणून पारंपरिक धान्य संवर्धन व लागवड या उपक्रमाअंतर्गत या दोन्ही संकटांवर मात करता येईल. तसेच रोजच्या जेवणातील वैविध्य वाढल्याने कुपोषणावरही मात करता येईल व पारंपरिक धान्याच्या विक्रीला बाजारभावही चांगला मिळत असल्याने तोही वेगळा लाभ होईल, असा विचार या प्रकल्पात करण्यात आला आहे.

या प्रकल्पाअंतर्गत १८ ते ३० या वयोगटातील तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या तरुण शेतकऱ्यांना या प्रकल्पात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी प्रकल्पाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिंजगाव येथील गावकऱ्यांच्या पुढाकाराने २०१९ मध्ये साधना विद्यालयाची स्थापना झाली. त्याचअंतर्गत तरुण मुलांना स्वयंपूर्ण व सक्षम बनविण्यासाठी अनेक उपक्रम नियोजनात आहेत. त्यातील पहिला टप्पा हा पारंपरिक धान्य संवर्धन व लागवड हा आहे. या प्रकल्पाची जबाबदारी अमित कोहली व शांती गायकवाड यांची आहे. लोकबिरदारी प्रकल्पाच्या समीक्षा आमटे यांनी अनेक दुर्गम गावांमध्ये जाऊन ५ पारंपरिक धान्याची ( धान/तांदूळ सोडून) बिजाई गोळा केली आहे. तसेच विविध ७ डाळींची बिजाईदेखील आहे, डाळींची पेरणी दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे.

हे वर्ष धान्य बिजाई बॅंकनिर्मिती व डेमो प्लॉटमार्फत शिक्षण-प्रशिक्षणासाठी राहील. उत्पादन व विक्री पुढील वर्षात करायचा मानस आहे. पहिल्या प्लॉटची लागवड सामूहिक श्रमदानातून जिंजगाव येथे करण्यात आली. येत्या काही दिवसांत हेमलकसा, रानीपोडूर व नेलगुंडा या गावांमध्येही लागवड करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा -  खासदार नवनीत राणा यांना नागपूरला हलविले
सत्कार, नृत्य, प्रबोधन...
या उपक्रमात जिंजगाव येथील गोटुलमध्ये आल्यावर काही शैक्षणिक खेळ खेळण्यात आले. प्रकल्प अधिकारी मनुज जिंदल यांनी सदिच्छा भेट देऊन दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या साधना विद्यालयाच्या मुलांचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. बांदीयानगर येथील तरुणांनी पारंपरिक पोशाखात नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. श्‍यामराव शेडमाके यांनी प्रबोधन केले.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farming in lokbiradari