का घेतली पित्याने मुलीसह विहिरीत उडी? पिता गतप्राण, मुलगी मात्र वाचली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

 घाटंजी पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या शिरोली येथे पित्याने चिमुकलीस विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पित्याचा मृत्यू झाला असून लोकांना चिमुकलीला वाचविण्यात यश आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

यवतमाळ : टाळेबंदीने अनेकांचे रोजगार हिरावले. त्याचा परिणाम अनेकांच्या मानसिक आरोग्यावर झाला. त्यातूनच एका तरुणाने पोटच्या मुलीसह विहिरीत उडी घेतल्याची मन हेलावणारी घटना घडली.
 घाटंजी पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या शिरोली येथे पित्याने चिमुकलीस विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पित्याचा मृत्यू झाला असून लोकांना चिमुकलीला वाचविण्यात यश आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
किशोर शं.आत्राम (वय ३० वर्षे, रा. शिरोली) या तरुणाने मंगळवारी (ता. १९) दुपारी गावाशेजारी शेतात असलेल्या विहिरीत आपल्या लहान मुलीसह उडी घेतली. ही घटना गावातील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी विहिरीत उड्या मारून त्या बापलेकीला वाचवण्याची धडपड केली. दोन वर्षीय चिमुकली प्रीती हिला विहिरीतून पाण्याबरोबर काढले व प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर येथे नेऊन तिथून ग्रामीण रुग्णालय घाटंजी येथे उपचारासाठी दाखल केले असता पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले. मात्र, किशोर हा विहिरीच्या तळाशी गेल्याने व विहिरीत पाणी भरपूर असल्याने सापडला नाही. नंतर सदर घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले व  विहिरीत शोधाशोध कली असता किशोरचा मृतदेह सापडला. तेव्हा घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. परंतु सायंकाळची वेळ असल्यामुळे शवविच्छेदन होऊ शकले नाही. बुधवारी (ता. २०) शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. किशोरवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर वाचा - सुन्न करणारी बातमी, उपासमार असह्य झाल्याने दिव्यांग व्यक्तीची मंदिरात आत्महत्या 

मुलगी प्रीती हिच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू असून तिची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले. किशोर हा पत्नी भिमाबाई व दोन मुली प्रिया व प्रीती यांच्यासह  राहत होता. या कुटुंबाचा उदरनिर्वाह  रोजमजुरीवर होता. आज अचानक चिमुकल्या लहान मुलीसह विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्याने का केला याचे कारण कळू शकले नाही. मात्र, लॉकडॉउनमध्ये मजुरी नसल्याने त्याच्यावर ताण वाढला होता, अशी माहिती मिळाली आहे.
या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात जमादार प्रदीप मेसरे, राजेश, दिलीप दाभेकर, खरतडे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father commits sucide with daughter, daughter survives