च्या पित्तर... मुलाला कोरोना अन् वडिलांनी घरोघरी जाऊन केली अनेकांची हजामत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

संबंधित युवक हा मध्यंतरी अकोला येथे असल्याचे समजते. त्याच्या वडिलांचा सलून व्यवसाय असून त्यांनी मुलगा गावाहून परतल्यानंतरसुद्धा अनेक घरी जाऊन अनेकांची दाढी-कटिंग करून दिल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर परिसरात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

अमरावती : सध्या संपूर्ण देशभर कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने नागरिक देखील सुसाट झाले आहेत. छोट्या छोट्या कामानिमित्त घराबाहेर पडून गर्दी केली जात आहे. परिणामी बेसावध असलेल्या अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. आता हेच बघा ना अमरावतीमध्ये असाच एक अफलातून प्रकार पुढे आला आहे. एका मुलाला कोराना झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी घरोघरी जाऊन दाढी-कटिंग केली. यामुळे आणखी काही नागरिक अडचणीत आले आहेत.

दररोज नव्या नव्या परिसरात कोरोनाबाधित आढळत असल्याने अमरावती शहरातील यंत्रणेची आता दमछाक होऊ लागली आहे. स्थानिक प्रभा कॉलनी येथील 23 वर्षीय युवकाचा कोरोना चाचणी अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. संबंधित युवक हा मध्यंतरी अकोला येथे असल्याचे समजते. त्याच्या वडिलांचा सलून व्यवसाय असून त्यांनी मुलगा गावाहून परतल्यानंतरसुद्धा अनेक घरी जाऊन अनेकांची दाढी-कटिंग करून दिल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर परिसरात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

संबंधित युवकाला प्रवासाची हिस्ट्री असून मनपा त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत आहे तसेच त्यांचे नमुने घेण्याची प्रक्रियादेखील आरोग्य विभागाने सुरू केल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्रात दररोज नव्या नव्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्याबरोबरच संबंधित परिसराला कंटेनमेंट क्षेत्र घोषित करणे, संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती, त्यांचा संपर्क शोधणे व त्यांचे नमुने घेणे ही प्रक्रिया आता प्रशासनासाठी दिवसेंदिवस जटिल होऊ लागली आहे. शहरात आतापर्यंत 60 पेक्षा अधिक कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहेत. शेवटचा रुग्ण आढळल्यापासून 28 दिवस कंटेनमेंट क्षेत्र ठेवावे लागते. त्यामुळे या कालावधीत नागरिकांची गैरसोय होण्यास मोठा वाव असतो.

तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला

ट्रू नेट मशीन हलविली
अत्यंत अटीतटीच्या प्रसंगी कोरोनाची चाचणी करण्यासाठी उपयोगात येणारी ट्रू नेट मशीन पीडीएमसीमधून आता जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मशीनचा उपयोग संशयित परंतु गंभीर व्यक्ती, गरोदर महिलांची चाचणी करण्यासाठी केला जाऊ शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father of corona positive youth served many