
सध्याचा हा हिवाळ्याचा काळ आहे. या काळात गरम पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी चूल पेटवावी लागते आणि चुलीसाठी सरपण गरजेचे असते. त्यामुळे वाघांचा वावर असलेल्या जंगलातही केवळ चूल पेटवायला नागरिक जिवाचा धोका पत्करून जात आहेत.
गडचिरोली : जिल्ह्यात विशेषत: वनविभागाच्या वडसा व गडचिरोली उपविभागात काही महिन्यांत वाघांचे हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने वाघांचा वावर असलेल्या जंगलात जाण्यास मनाई केली आहे. मात्र, चूल पेटवायला सरपण मिळावे म्हणून अनेक ग्रामस्थ जिवावर उदार होऊन जंगलात जात जीव गमावत आहेत. शेवटी चुलीपुढे मरणाचे भय भस्मसात झाल्याचे दिसून येत आहे.
तीन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात वाघांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे. पण, त्यासोबतच वाघांचा वावर गावांच्या जवळपासच्या जंगल परिसरातही वाढला आहे. त्यामुळे जंगलात कधी सरपण, तर कधी केरसुनीचे गवत गोळा करायला जाणाऱ्या नागरिकांवर वाघाचा हल्ला होताना दिसत आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवशी ३१ जानेवारीला गडचिरोली तालुक्यातील धुंडेशिवनी जंगल परिसरात सरपण गोळा करायला गेलेल्या दयाराम धर्माजी चुधरी या व्यक्तीला ठार केले.
यापूर्वी कळमटोला येथील एका महिलेवरही वाघाने हल्ला केला होता. दोन महिन्यांपूर्वी गडचिरोली शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर जंगलात सरपणासाठी गेलेल्या महिलेला वाघाने ठार केले होते. त्यापूर्वी, राजगाटा येथेही एका व्यक्तीला वाघाने ठार केले. या सर्व घटना बघता बहुतांश नागरिक जंगलात सरपणासाठी गेल्याचे दिसून येत आहे.
सध्याचा हा हिवाळ्याचा काळ आहे. या काळात गरम पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी चूल पेटवावी लागते आणि चुलीसाठी सरपण गरजेचे असते. त्यामुळे वाघांचा वावर असलेल्या जंगलातही केवळ चूल पेटवायला नागरिक जिवाचा धोका पत्करून जात आहेत. एरवी नागरिक वर्षभर जंगलातून सरपण आणत असले, तरी हिवाळ्यात लाकडांची अधिक गरज पडते. त्यामुळेच धोका पत्करला जात असून प्रसंगी अनेकांच्या जिवावर बेतत आहे.
दरवाढीचे दुष्टचक्र
ग्रामीण भागातील नागरिकांचा जंगलावरील भार कमी व्हावा आणि चुलीला दुसरा पर्याय मिळावा, यासाठी सरकारने उज्ज्वला गॅस योजनेतून अनेकांना गॅस शेगडी व सिलिंडर दिले आहेत. पण, या योजनेत सिलिंडर रिफिलिंगची सोय नाही. गॅस शेगडी आणि पहिले सिलिंडर मोफत मिळत असले, तरी पुढे सिलिंडर रिफिलिंगचा खर्च लाभार्थ्यालाच करावा लागतो. सध्या रिफिलिंगचे दर प्रचंड वाढले आहेत. दरवाढीच्या दुष्टचक्रामुळे ग्रामीण भागांतील गॅस अनेक घरांत शोभेपुरती किंवा चहा करण्यापुरती उरली आहे. स्वयंपाक, अंघोळीचे पाणी तापविणे, या सर्व कामांसाठी पुन्हा चुलीवरचे अवलंबित्व वाढत आहे.