टिपेश्‍वरलगतच्या ‘या‘ गावांतील नागरिक ‘त्याच्या‘ दहशतीत...कोण आहे तो?

सूरज पाटील
Monday, 10 August 2020

टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी गावांमध्ये वाघाने मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे या गावातील शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. वाघाने शेतकरी, मजुरांच्या पशुधनाचा फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतीकामे प्रभावित झाली आहेत.

यवतमाळ : अलीकडे पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या टिपेश्‍वर अभयारण्यातील वाघांनी गावालगत असलेल्या शेतशिवारात धुमाकूळ घातला आहे. या शेतशिवारात त्यांनी मुक्तसंचार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागही काही उपाययोजना करीत नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी वन अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहनांना घेराव घालीत संताप व्यक्त केला. यावेळी शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

वनविभागाने उपाययोजना कराव्या

टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी गावांमध्ये वाघाने मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे या गावातील शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. वाघाने शेतकरी, मजुरांच्या पशुधनाचा फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतीकामे प्रभावित झाली आहेत. याबाबत वनविभागाकडे तक्रारी करूनसुद्धा उपाययोजना केल्या जात नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

शेतकऱ्यांची व्यथा

दरम्यान, यावर तोडगा म्हणून उपवनसंरक्षक के. अभर्णा यांच्यासह वरिष्ठ वनाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी बैठक घेत चर्चा केली. या बैठकीत वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. वाघाच्या भीतीमुळे शेतात जाण्याची भीती वाटते. मजूरही मिळत नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

जाणून घ्या : पुढील तीन-चार दिवस विदर्भासाठी धोक्याचे; प्रादेशिक हवामान विभागाने दिला हा इशारा

वनविभागाकडून आश्‍वासन

टिपेश्‍वर अभयारण्यालगत असलेल्या अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी शेतशिवारात वाघाचे बछडे शेतशिवारात येत असल्याची दखल वनविभागाकडून घेण्यात आली. ग्रामस्थांना भयमुक्त करण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येईल, असे आश्‍वासन वनविभागाकडून देण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of tigers in villages near Tipeshwar Sanctuary