Gadchiroli News : पोलिसांच्या कारवायांमुळे घाबरलेल्या माओवाद्यांकडून सरकारपुढे युद्ध विराम प्रस्ताव

मागील दोन वर्षांपासून छत्तीसगड, महाराष्ट्रातील गडचिरोली, तेलंगणा, ओडिशा आणि झारखंड येथे माओवादाविरोधात जोरदार कारवाया सुरु आहेत.
Maoist
Maoistsakal
Updated on

गडचिरोली - मागील दोन वर्षांपासून छत्तीसगड, महाराष्ट्रातील गडचिरोली, तेलंगणा, ओडिशा आणि झारखंड येथे माओवादाविरोधात सुरू असलेल्या आक्रमक कारवायांमुळे घाबरलेल्या माओवाद्यांनी केंद्र सरकारपुढे युद्ध विरामाचा प्रस्ताव ठेवला आहे.

केंद्रीय समिती सदस्य अभय उर्फ सोनू भूपती याने यासंदर्भात माध्यमांना तेलुगू भाषेतील प्रसिद्धी पत्रक पाठवून कारवाया रोखण्याचे आवाहन सरकारला केले आहे. दोन दशकानंतर पहिल्यांदाच माओवाद्यांनी अशा प्रकारे शांतीप्रस्ताव पुढे केल्याने केंद्र सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२४ मार्च रोजी हैद्राबाद येथे एक गोलमेज बैठक घेण्यात आली होती. त्यात मध्य भारतात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्यात येऊन शांतीवार्ता केली पाहिजे, असे ठरविण्यात आले.

गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत देशातून माओवाद हद्दपार करणार, अशी घोषणा केल्यानंतर छत्तीसगड, गडचिरोली, तेलंगणा, ओडीशा आणि झारखंड राज्यात माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे. यामुळे १५ महिन्यांत झालेल्या चकमकीत तब्बल ४०० हून अधिक माओवादी ठार झाले. शेकडो कारागृहात आहेत.

इतकेच नव्हे तर यात अनेक निरपराध आदिवासी मारल्या गेल्याचा दावाही पत्रकात केला गेला आहे. ‘कागर’च्या नावावर केंद्र आणि राज्य सरकारांनी माओवाद प्रभावित क्षेत्रात अघोषित युद्ध सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांना दोनदा चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. पण आमच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही, असा आरोप माओवाद्यांनी लावला आहे.

सत्तापक्ष हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी आदिवासी, अल्पसंख्यांकांना लक्ष्य करत आहे. दुसरीकडे जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीसाठी आदिवासी समाज संघर्ष करीत आहे. येथील नैसर्गिक संसाधनांवर डोळा ठेवून हे सर्व सुरू असून सरकारने आता थांबायला हवे.

केंद्र आणि राज्य सरकार छत्तीसगड, गडचिरोली येथे सुरू असलेली पोलिस भरती, नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती आणि माओविरोधी कारवाया थांबविण्यास तयार असतील तर आम्ही शांतीवार्ता करण्यास तयार आहोत, असे माओवादी चळवळीतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नेता अभय उर्फ सोनू भूपती याने तेलुगू भाषेत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

विशेष म्हणजे माओवादी नेता अभय उर्फ सोनूने पत्रकात भीमा कोरेगावचादेखील उल्लेख केला आहे. शोषणाविरोधात आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांचा सरकारकडून छळ करण्यात येत आहे. त्यांच्या विरोधात गुप्तचर यंत्रणा आणि पोलिस बाळाचा वापर होतो आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात देखील अशाच प्रकारे अनेक कार्यकर्त्यांना कारागृहात डांबण्यात आले. आदिवासींना पोलिस दलात भरती करून त्यांच्याच हातून आदिवासीची हत्या केली जात आहे. असा आरोप देखील पत्रकात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com