अस्वलाची शिकार करण्यासाठी गेलेले दोन शिकारीच झाले शिकार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

मेळघाटात एका मादी अस्वलाने दाेन शिकाऱयांना ठार केले आहे. हे दोघे अस्वलाची शिकार करण्यासाठी गेले होते. विशेष म्हणजे या दाेघांनी अस्वलाच्या पिल्लांना ठार केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अमरावतीः अस्वलाची शिकार करण्याचे धाडस करणे दोघांच्या जीवावर बेतले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात संतापलेल्या अस्वलाने दोन व्यक्तींना फाडून टाकले. अस्वलाच्या हल्ल्यात दोघेही जागीच ठार झाले.

आपल्या पिल्लांविषची हिंस्त्र पशू फारच संवेदनशील असतात. पिलाच्या आसपास जरी कुणी भटकले तरी ते जीवघेणा हल्ला करतात. याबाबतीत अस्वल तर फारच क्रूर आणि हिंस्त्र पशू ठरू शकतो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट वन्यजीव विभागातील सोनाळा-वरवट वनपरिक्षेत्रातील सागमल्ली खडकपानी येथे निमखेडी या गावातील अशोक मोतीराम गवते (52 वय ),  व माना बंडू गवते (वय 42) हे दोघे शिकारीसाठी गेले होते. ज्या ठिकाणी अस्वलाने या दोघांना ठार केले तेथून मृतदेहापासून पंधरा ते वीस मिटर अंतरावर अस्वलाची दोन पिले ही मृतावस्थेत सापडली. याचाच अर्थ या दोघांनी प्रथम अस्वलाच्या पिलांची शिकार केली असावी. यानंतर चवताळलेल्या मादी अस्वलाने अशोक आणि माना यांच्यावर हल्ला केला असावा.

वाचा- झाडाच्या सावलीत बसली, डोळा लागला आणि पुढे...

शिकार करण्यासाठी गेलेल्या या दोघांचीच शिकार झाल्याचे गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास उघड झाले. पिलांच्या शरीरावर कुराडीचे घाव होते, असे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांनी सांगितले. अकोट वन्य जीव विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female killed two hunters in Melghat