कोरोना ब्रेकिंग : विदर्भात रुग्णांची वाढ थांबता थांबेना, एका दिवशी वाढले इतके रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

नागपुरात रोज अंकात रुग्णांची संख्या वाढत आहे. ही आकडेवारी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच मृतांचा आकडाही सतरावर पोहोचला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सतत प्रयत्न होत असतानाही प्रशासनाला उपयशच येत आहे. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागपूर : विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रोज दोन अंकात रुग्णांची वाढत होत असल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. एका दिवशी एकही रुग्ण आढळून आला नाही, असे महिनाभरात तरी झालेले नाही. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे एकूण स्थितीवरून दिसून येते. बुधवारी नागपुरात सात, अमरावतीत सात तर गडचिरोली एक रुग्ण आढळून आला. 

नागपुरात बाधितांचा आकडा पोहोचला 1084वर

नागपुरात रोज अंकात रुग्णांची संख्या वाढत आहे. ही आकडेवारी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच मृतांचा आकडाही सतरावर पोहोचला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सतत प्रयत्न होत असतानाही प्रशासनाला उपयशच येत आहे. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी सात रुग्णांची वाढ झाली आहे.

अधिक माहितीसाठी - सुंदर तरुणींना पुढे करून 'लुटेरी दुल्हन' प्रीती दास युवकांना ओढायची जाळ्यात, वाचा...

अमरावतीत अकरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

अमरावतीत मागील काही दिवसांपासून दररोज सहा ते सात रुग्णांची वाढ होत आहे. मागील काही दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आपल्याला ही बाब लक्षात येईल. मंगळवारी सायंकाळपर्यंत शहरात वीस रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामुळे प्रशासन चिंतेत होत. अशात बुधवारी सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सात रुग्णांमुळे कोरोनाबाधितांचा आकडा 375 वर पोहोचला आहे. गोपालनगर येथील पुरुष, चमननगर, बडनेरा येथील दोन पुरुष, धनराज लेन, सक्करसाथ येथील महिला, जामा मशिदीजवळ, साबण पुरा येथील पुरुष, बडनेरा रोड येथील पुरुष व चमननगर, जुनी वस्ती, बडनेरा येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

गडचिरोलीत वडसा तालुक्‍यात कोरोनाचा पहिला रुग्ण

मंगळवारी रात्री वडसा तालुक्‍यात एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय बाधितांची संख्या 11 झाली आहे. वडसा येथील 26 वर्षीय युवकाला जिल्ह्यात आल्यानंतर वडसा येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. वाशी मुंबई येथून सहा जूनला एकूण 29 प्रवासी खासगी बसने वडसा येथे आले होते. त्यातील दहा जणांना वडसा येथे विलगीकरणात ठेवण्यात आले. 17 जणांना धानोरा तालुक्‍यात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. उर्वरित दोन गोंदिया जिल्ह्यातील होते. त्यांना त्या ठिकाणी विलगीकरणात ठेवले आहे. जिल्ह्यात एकूण बाधित 52 झाले असून, आतापर्यंत 40 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifteen corona patients found to Vidarbha on Wednesday