पासपोर्ट काढताय, सावध राहा

केतन पळसकर
रविवार, 29 डिसेंबर 2019

पंधराशे रुपयांच्या पासपोर्टची किंमत चार ते पाच हजार रुपयापर्यंत असल्याने नागरिकांना जवळपास 2 हजार 500 ते 3 हजार 500 रुपये भुर्दंड बसतो आहे. तंत्रज्ञानात केलेले बदल, पासपोर्ट सेवा केंद्राची वाढलेल्या संख्येमुळे अवघ्या काही दिवसांमध्ये पासपोर्ट घरपोच प्राप्त होतो आहे.

नागपूर : विदेशामध्ये पर्यटनासाठी, शिक्षणासाठी किंवा अन्य कामाकरिता जाण्यासाठी "पासपोर्ट' अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. दररोज हजारो नागरिक पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करतात. मात्र, त्यासाठी ऑनलाइन अर्ज करीत असाल तर जरा सावध रहा. कारण, अनेक बनावट वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांची लूट होते आहे. या माध्यमातून पंधराशे रुपयांचा पासपोर्ट पाच हजार रुपयांमध्ये मिळतो आहे.

हे वाचाच - वारे डॉक्टर; युवतीला केली शरीरसुखाची मागणी

केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या क्षेत्रीय पासपोर्ट विभागाने वर्षभरात विदर्भामध्ये प्रत्येक लोकसभा मतदार संघनिहाय दहा नवे पासपोर्ट सेवाकेंद्र सुरू केले आहेत. यामुळे अर्जदारांना जलदगतीने पासपोर्ट हातामध्ये मिळतो आहे. अर्जदार एजंटची मदत न घेता स्वत: वेबसाइटच्या मदतीने पासपोर्टसाठी अर्ज करू शकतो. मात्र, पासपोर्ट काढण्यासाठी अनेक बनावट वेबसाइट इंटरनेटवर उपलब्ध असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. या बनावट वेबसाईटमुळे तिप्पट रक्कम अर्जदार भरतो आहे.

पंधराशे रुपयांच्या पासपोर्टची किंमत चार ते पाच हजार रुपयापर्यंत असल्याने नागरिकांना जवळपास 2 हजार 500 ते 3 हजार 500 रुपये भुर्दंड बसतो आहे. तंत्रज्ञानात केलेले बदल, पासपोर्ट सेवा केंद्राची वाढलेल्या संख्येमुळे अवघ्या काही दिवसांमध्ये पासपोर्ट घरपोच प्राप्त होतो आहे. तसेच, वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी)च्या माध्यमातून फक्त शंभर रुपयांच्या मोबदल्यात अर्जदाराला अर्ज भरून दिला जातो आहे. पासपोर्ट विभागातील यंत्रणेने कात टाकल्यामुळे पासपोर्टची "एजंटमुक्त' होण्याकडे वाटचाल सुरू असली तरी अशा बोगस वेबसाइटमुळे पासपोर्ट विभागापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. बनावट वेबसाइटच्या तयार झालेल्या या नव्या जाळ्यात अनेक अर्जदार फसत चालले आहेत.

अधिकृत वेबसाइटचाच आधार घ्यावा
एजंट बरेचदा अर्जदाराला न विचारता अर्जामध्ये चुकीची माहिती भरतात. त्यामुळे, अर्जदाराला दंड भरावा लागतो. नागरिकांनी स्वत: अर्ज भरल्यास होणाऱ्या चुका टाळता येतील. तर, ऑनलाइन अर्ज भरताना वेबसाइटच्या शेवटी "gov.in' लिहिलेले आहे किंवा नाही, हे अर्जदाराने तपासावे. पासपोर्ट विभागाची www.passportindia.gov.in ही अधिकृत वेबसाइट आहे. नागरिकांनी अर्ज करताना ही बाब लक्षात घेत बीनचूक अर्ज भरावा. यामुळे, अर्जदाराला आर्थिक भुर्दंड बसणार नाही. अशा बनावट वेबसाइटबाबत आम्ही सायबर क्राइम विभागाला कळविले आहे.
- सी. एल. गौतम,
क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी, नागपूर.

सहापेक्षा जास्त बनावट वेबसाइट

सहापेक्षा जास्त बनावट वेबसाइटच्या माध्यमातून अर्जदारांची फसवणूक होते आहे. यामध्ये, प्रामुख्याने अर्जदारांनी www.indiapassport.org, www.onlinepassportindia.com, www.passportindiaportal.in, www.passport-india.in, www.passport-seva.in, www.applypassport.org या वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करणे टाळावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifteen hundred rupees Passport worth in five thousand rupees