...अन्‌ त्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोरच काढली फिनाइल बॉटल 

phynail bottle
phynail bottle

अमरावती : शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे निधी आहे. मात्र, अनाथ दिव्यांगाला घरकुल देण्यासाठी निधी नाही, असे सांगत एक युवक गुरुवारी, 2 डिसेंबर रोजी फिनाइलची बॉटल घेऊन थेट अमरावती येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचला आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोरच फिनाइल पिण्याची धमकी दिली. 

घरकुलासाठी झिजविले शासनाचे उंबरठे 

आपल्या मागणीसाठी असे "अनोखे' आंदोलन करणाऱ्या युवकाचे नाव राजेश सुरेश बुरघाटे असून तो अमरावती शहरातील गाडगेनगर भागात असलेल्या रिमांड होम लाइनमध्ये राहतो. शासनाच्या योजनेतून आपल्याला हक्काचे घरकुल मिळावे म्हणून तो शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवीत आहे. या बाबूला भेट, त्या अधिकाऱ्याची भेट घे, असे करीत दहा वर्षे लोटली, मात्र त्याच्या पदरी निराशाच आली. 
जिल्हाधिकारी तरी आपल्याला न्याय देतील, असा विचार करून त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला त्यांच्या कार्यालयात जाण्याचे ठरविले. 

गाठले जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय 

नवीन वर्ष 2020 उजाडले. गुरुवारी, 2 जानेवारी रोजी तो जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला जाण्यास निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर प्रथम तेथील पोलिस शिपायांनी त्याला अडविले. कोण रे तू? कुठे चाललास, कोण पाहिजे? असे म्हणत प्रश्‍नांचा भडिमार सुरू केला. राजेश बुरघाटे याने त्यांच्याकडे आपली कैफियत मांडून साहेबांची भेट घ्यायची असल्याची इच्छा व्यक्त केली. एक पोलिस शिपाई त्याला घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेला. 

साहेब, मला घर द्या हो! 

दालनात गेल्यानंतर राजेशने जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपल्याला शासकीय योजनेतून घरकुल मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली. दहा वर्षांपासून आपण यासाठी प्रयत्न करीत असून कोणत्याही अधिकाऱ्याने आपल्याला घरकूल मिळवून दिले नाही. म्हणून मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो साहेब, असे म्हणाला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्याचे म्हणने शांतपणे ऐकून घेतले. तेवढ्यात, मला घरकुल मिळाले नाही तर मी येथेच विषप्राशन करतो, असे म्हणत त्याने खिशातून फिनाइलची बाटली काढली. तोच पोलिस कर्मचारी विजय ढोके यांनी झडप घालून त्याच्या हातातील बाटली हिसकली. 

...अन्यथा उचलेन आक्रमक पाऊल! 

राजेशने दिलेल्या निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांनी शेरा लिहून त्याला अमरावती महानगर पालिकेच्या आयुक्तांकडे जाण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर त्याचवेळी महानगर पालिका आयुक्तांना फोन करून अपंग राजेशला घरकुल मिळवून देण्याविषयी चर्चा केली. महानगर पालिका आयुक्तांनीही जर आपल्याला न्याय दिला नाही, तर मात्र 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी मी आक्रमक पाऊल उचलेन, असा इशाराही त्याने त्याचवेळी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com