कर्ज देण्याचे आमिष दाखवून १२ शेतकऱ्यांकडून उकळले ६० हजार, फायनान्स कंपनीच्या मालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

सूरज पाटील
Wednesday, 2 December 2020

तिघांनी संगनमत करून शेतकऱ्यांना साई मायक्रो ऍण्ड आदित्य फायनान्स कंपनीकडून शेतीच्या सात-बारावर एक लाख रुपये कर्ज देतो, अशी बतावणी केली. शेतकऱ्यांनी नोंदणीचे पैसे भरले. मात्र, कर्ज हवे असल्यास पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली. 12 शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये याप्रमाणे 60 हजार रुपये उकळले.

यवतमाळ : साई मायक्रो ऍण्ड आदित्य फायनान्स कंपनीने 12 शेतकऱ्यांना एक लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून 60 हजार रुपये उकळले. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या धनादेशावर बनावट स्वाक्षरी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा - धक्कादायक आकडेवारी! यवतमाळ जिल्ह्यात ११ महिन्यांत तब्बल २५० शेतकऱ्यांनी संपवली...

फायनान्स कंपनीचे मालक आदित्य पाटील (वय 46), व्यवस्थापक सचिन शिंदे (वय 32), एजंट अक्षय गावंडे (वय 30, रा. यवतमाळ) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. तिघांनी संगनमत करून शेतकऱ्यांना साई मायक्रो ऍण्ड आदित्य फायनान्स कंपनीकडून शेतीच्या सात-बारावर एक लाख रुपये कर्ज देतो, अशी बतावणी केली. शेतकऱ्यांनी नोंदणीचे पैसे भरले. मात्र, कर्ज हवे असल्यास पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली. 12 शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये याप्रमाणे 60 हजार रुपये उकळले. कर्ज न देता एचडीएफसी बँकेचे धनादेश दिले. शेतकरी धनादेश वटविण्यासाठी बँकेत गेले असता, स्वाक्षरी चुकीची असल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात धडक दिली. याप्रकरणी विलास दत्तात्रेय रोहणे (वय 40, रा. केळापूर) यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आदित्य पाटील, सचिन शिंदे, अक्षय गावंडे या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा - ‘डिअर मम्मी-पप्पा, तुम्ही वेळ देत नाही आम्ही घर सोडतोय...

व्यवस्थापकाच्या अडचणीत वाढ -
फायनान्स कंपनीकडे शेतकऱ्याने आपले राहते घर गहाण ठेवून कर्ज घेतले. मात्र, कंपनीच्या वतीने दिलेला धनादेश बँकेत दोनवेळा वटला नाही. त्यामुळे तरुण शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. श्‍यामसुंदर टेकाम असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शंकर टेकाम यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून साई मायक्रो फायनान्स व्यवस्थापक सचिन शिंदे (रा. यवतमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. इतरही शेतकऱ्यांची त्याने फसवणूक केल्याची चर्चा आहे. या घटनांमुळे व्यवस्थापकाच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finance company fraud with farmer in yavatmal