धक्कादायक आकडेवारी! यवतमाळ जिल्ह्यात ११ महिन्यांत तब्बल २५० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

चेतन देशमुख 
Tuesday, 1 December 2020

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या अपेक्षा, स्वप्न पूर्ण करण्यास कमी पडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे आत्महत्येचे सत्र थांबलेले नाही.

यवतमाळ : नापिकी, हमीभाव नाही, नैसर्गिक आपत्तीची भरपाई नाही, कर्जमाफीची प्रतीक्षा, खासगी सावकारांसह बॅंकांच्या कर्जाचा वाढलेला बोजा, कोरोनाच्या काळात झालेली कोंडी अशा कारणांनी जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत जिल्ह्यातील 282 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या अपेक्षा, स्वप्न पूर्ण करण्यास कमी पडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे आत्महत्येचे सत्र थांबलेले नाही. गेल्या 2001पासून 11 नोव्हेंबरपर्यंत चार हजार 780 शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आपली जीवनयात्रा संपविली आहे. 

जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

लॉकडाउनच्या काळातही शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. चार हजार शेतकऱ्यांपैकी एक हजार 877 शेतकऱ्यांचा आत्महत्या शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरल्या. दोन हजार 851 शेतकरी आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरल्या आहेत, तर 52 प्रकरणे अजूनही चौकशीत आहेत. 

गेल्या 11 महिन्यांची आकडेवारी बघितल्यास सर्वाधिक 44 आत्महत्या ह्या ऑगस्ट महिन्यात झाल्या आहेत. विविध संकटांचा सामना करीत जगाचा पोशिंदा ठरलेल्या बळीराजाला यंदा कोरोनाच्या लॉकडाउनचा नवा अनुभव झाला.

अधिक वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनलाही कमी भाव 

महिनानिहाय झालेल्या आत्महत्या

जानेवारी- 18
फेब्रुवारी- 25
मार्च- 13
एप्रिल- 17
मे- 31
जून- 26
जुलै- 34
ऑगस्ट- 44
सप्टेंबर- 36
ऑक्‍टोबर- 26
नोव्हेंबर- 12

.
संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 250 plus farmers end their life in just 11 months in Yavatmal