माहिती मागितल्याने 'आरटीआय' कार्यकर्त्याला मारहाण, आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIR against

माहिती मागितल्याने 'आरटीआय' कार्यकर्त्याला मारहाण, आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल

यवतमाळ : घाटंजी व आर्णी तालुक्‍यांतील वाळूघाटांची माहिती सीसीटीव्ही फुटेजसह माहिती अधिकारांतर्गत मागितली. म्हणून आरटीआय कार्यकर्त्याला (RTI activist) बंदुकीच्या धाकावर वाहनात डांबून नेत बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (ता.19) दुपारी येथील पांढरकवडा (pandharkawada) मार्गावरील एस. एम. कंट्रक्‍शन येथे घडली. आरटीआय कार्यकर्त्याचा नग्न व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (fir filed against nine poeple in RTI activist beating case in yavatmal)

हेही वाचा: गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक; १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

चंदन सुदाम हातागडे (वय 35, रा. नेताजीनगर, यवतमाळ) असे मारहाण करण्यात आलेल्या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी सगीर मिस्त्री, समीर राजा, सलिम अन्सारी, सचिन महल्ले, अतुल कुमटकर, छोटू भांदक्कर, शाज अहेमद, अजय गोलाईत, कादरचा भाऊ मन्सूर आदींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातागडे याने पाच मार्च रोजी आर्णी व घाटंजी तहसील कार्यालयांत माहिती अधिकारान्वये अर्ज दिला होता. लिलाव झालेल्या तारखेपासूनचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. बुधवारी चंदन व त्याचा भाऊ विकास पार्सल घेण्यासाठी पांढरकवडा मार्गावरील ढाब्याजवळ थांबून होते. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या समीर राजाने फोन लावून सगीर मिस्त्रीशी बोलायला सांगितले. बोलून फोन ठेवत नाही तोच कारमधून पाच ते सहा जण आलेत. सलीमने बंदुकीचा धाक दाखवून हातागडे बंधूंना वाहनात बसवून एस. एम. कन्स्ट्रक्‍शन येथे आणले. या ठिकाणी प्लॅस्टिक पाइप, लाकडी फळी, वायर, बेल्ट अशा वस्तूंनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बेशुद्ध पडल्यावर पाणी टाकून शुद्धीवर आणून वाळूतस्करांनी पुन्हा मारहाण केली. यावेळी एक नग्न व्हिडिओ बनविण्यात आला. शिवाय स्टॅम्प पेपरवर सह्याही घेतल्या. कपडे घालायला दिल्याने पॅन्टच्या खिशातील 28 हजार रुपये रोख गायब होते. त्यांच्यापैकीच कुणीतरी ही रोकड उडविल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. पुन्हा असा प्रकार केल्यास ट्रकखाली चिरडून टाकण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत पडून असताना एक रुग्णवाहिका चंदन व विकासला घेऊन यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात पोहोचली. दोघांची अवस्था बघून त्यांना रुग्णालयात नेण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. याप्रकरणी चंदन हातागडे याने गुरुवारी (ता.20) पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रदीप शिरस्कर करीत आहेत.

हेही वाचा: कोरोना नाही तर 'या' आजाराचं मेळघाटातील गावात थैमान

नग्न व्हिडिओ व्हायरल

मारहाण केल्यानंतर आरटीआय कार्यकर्त्याचा नग्नव्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्यात आला आहे. ब्लॅकमेलर असल्याचे सांगत हजारो रुपये घेत असल्याचे चंदन याने कबूल केले. किती वाळूसाठ्याचे फोटो काढले, हेदेखील त्याने सांगितले. या व्हिडिओत यवतमाळ तहसीलदारांच्या नावाचाही उल्लेख आला आहे. सदर व्हीडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

तिघांना चार दिवसांची कोठडी -

मारहाणीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. त्यात सगीर मिस्त्री, शाज अहेमद व अजय गोलाईत यांचा समावेश आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, फरार असलेल्या इतर संशयित आरोपींचा कसून शोध पोलिस घेत आहेत.

loading image
go to top