मोबाइलसाठी मुलगा वडिलांना, तर दारूच्या नशेत वडील मुलाला ठार करतात तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

वडील दारूच्या नशेत नेहमी मुलाला मारहाण करीत होते. मोबाइल फोडल्याने मुलाचा राग अनावर झाला. त्याने वडिलांचा खून केला.

यवतमाळ : चार्जिंगला लावलेला मोबाइल फोडल्याच्या कारणातून राग अनावर झाल्याने विधीसंघर्षग्रस्त बालकाने वडिलांचा खून केला. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्‍यातील हिवरा (संगम) येथे सोमवारी (ता.18) दुपारी घडली. तर दुसऱ्या घटनेत दारूच्या नशेत वडिलांनी दीड वर्षीय मुलाला जमिनीवर आदळून संपविले. ही घटना पांढरकवडा तालुक्‍यातील गणेशपूर (वाई) शेतशिवारात रविवारी (ता.17) रात्रीदरम्यान घडली. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात जनमानस सुन्न झाले आहे. 

हिवरा (संगम) येथे झोपडपट्टीलगत असलेल्या वसाहतीत एक कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुलाने चार्जिंगला लावलेला मोबाइल आईला मागितला. त्यावेळी वडिलांनी मोबाइल फोडला. मारहाणीत वडिलांच्या डोक्‍यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपासून मुलाच्या हाताला कोणतेही काम नव्हते. वडील दारूच्या नशेत नेहमी मुलाला मारहाण करीत होते. मोबाइल फोडल्याने मुलाचा राग अनावर झाला. त्याने वडिलांचा खून केला. महागावचे ठाणेदार दामोदर राठोड, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. 

अवश्य वाचा- खिशातून पाचशे रुपये काढले म्हणून केला मित्राचा खून...

दुसरी घटना जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्‍यात घडली. यात दारूच्या नशेत वडिलांनी दीड वर्षाच्या मुलाला संपविले. पती कोणताही कामधंदा करीत नसल्यामुळे पिंटू सुधाकर चव्हाण याला त्याची पत्नी सैनाबाई हिने तिच्या माहेरी गणेशपूर (वाई) येथे आणले होते. त्यांना शिवम (वय तीन) आणि सावन (वय दीड वर्ष) असे दोन मुले होती. पिंटू चव्हाण कोणतेही काम न करता पत्नी व मुलांना नेहमीच मारहाण करीत होता. रविवारी (ता.17) रात्री नऊ वाजता पत्नी स्वयंपाक करून जेवणाची वाट बघत होती. कोणतेही कारण नसताना पिंटू चव्हाणने मोठा मुलगा शिवम याला बुक्‍क्‍याने मारहाण केली. त्याच्या नाकातून रक्त वाहायला लागले. पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिच्या कुशीत असलेला दीड वर्षीय मुलगा सावन याला हिसकावून घेऊन गेला. शेतशिवारात जाताच मुलाचे दोन्ही पाय पकडून त्याला जमिनीवर आदळून ठार केले. मुलाला ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In first case Son killed father and in second father killed son