Video : या जिल्ह्याच्या 'ऑरेंज झोन'मध्ये समावेश झाल्यानंतर आढळला पहिला 'कोरोना'बाधित

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी सायंकाळी साडेआठ वाजता 50 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा परिसर सील केला आहे. परिसरात या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी रात्रीच कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

चंद्रपूर : देशात कोरोना विषाणूने चांगलाच थैमान घातला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरली आहे. एकट्या विदर्भाचा विचार केला तर नागपूर आघाडीवर असल्याचे दिसून येते. येथेच मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर यवतमाळ आणि अमरावतीचा नंबर लागलो. उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव व्हायचा होता. मात्र, आता भंडारा पाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आल्याने आणखी एका जिल्ह्याचा कोरोनाच्या यादीत समावेश झाला आहे. 

विदर्भात सर्वाधिक रुग्ण नागपुरात आढळूल आले आहेत. येथील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 150 च्या जवळपास पोहोचली आहे. दिवसागणिक यात वाढच होत आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहून देशात लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. तसेच जिथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले त्यांचा "रेड झोन'मध्ये समावेश केला आहे.

हेही वाचा - अरेरे! काय झाले होते "त्याला', की वृद्‌ध आईलाच निदर्यपणे संपविले...

विदर्भात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून नागपुरात सर्वाधिक रुग्ण आढळून यायला सुरुवात झाली. यानंतर यवतमाळ जिल्ह्यात काही रुग्ण आढळून आले. तसेच अमरावती जिल्ह्यातही रुग्णांची नोंद व्हायला सुरुवात झाली. उर्वरित जिल्हे मात्र कोरोपासून वाचले होते. ही बाब समाधानकारक वाटत होती. मात्र, अचानक भंडारा जिल्ह्यात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. यामुळेच प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली. 

आता तर चंद्रपूर जिल्ह्यामध्येही कोरोनाने आपला शिरकाव केला आहे. शानिवारी सायंकाळी 8:30 वाजता एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे चंद्रपूर महानगरातील बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या क्रिष्णानगर भागाला पूर्णतः बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच चंद्रपूर जिल्ह्याचा "ऑरेंज झोन'मध्ये समावेश करण्यात आला होता. यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी सायंकाळी साडेआठ वाजता 50 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा परिसर सील केला आहे. परिसरात या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी रात्रीच कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. रविवारपासून महानगर परिसरात लॉकडाउन आणखी कडक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी - ठाकरे सरकारने केंद्राने दिलेल्या निधीपैकी दमडीही खर्च केली नाही

लॉकडाउनचे नियम पाळा 
चंद्रपूर जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. यामुळे बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या क्रिष्णानगर भागाला पूर्णतः बंद करण्यात आला आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. विनाकारण घराबाहेर पडू नका व लॉकडाउनचे नियम पाळा. 
- डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी.

विदर्भातील तीन जिल्हे 'रेड झोन'मध्ये

नागपूरचा "रेड झोन'मध्ये समावेश राहील याची पूर्वीपासूनच कल्पना होती. कारण, येथे सर्वाधिक रुगण आढळून येत आहेत. मात्र, यवतमाळ आणि अमरावती यांचा यात समावेश होईल असे वाटत नव्हते. कारण, येथे थोड्याअधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, यवतमाळात 80 आणि अमरावतीत 53 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या दोन्ही जिल्ह्याचा "रेड झोन'मध्ये समावेश करण्यात आला आहे. 

तीन जिल्हे कोरोनामुक्‍त

विदर्भातील तीन जिल्ह्यांचा "रेड झोन' समावेश करण्यात आला असला तरी तीन जिल्हे वर्धा, गोंदिया व गडचिरोली हे अद्याप कोरोनामुक्‍त आहेत. या जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ही समाधानकारक बाब असली तरी हे टिकवून ठेवणे गरजेचे झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first corona positive patient was found in Chandrapur district