३५ वर्षांपूर्वी झाली होती पहिली शेतकरी आत्महत्या, आज एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन

first farmer sahebrao karpe suicide before 35 years ago in chilgavan of yavatmal
first farmer sahebrao karpe suicide before 35 years ago in chilgavan of yavatmal

वरुड (जि. अमरावती) : शेतकरी आत्महत्यांची मालिका अजूनही सुरूच आहे. पहिली शेतकरी आत्महत्या तब्बल ३५ वर्षांपूर्वी झाली होती. १९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी सहकुटुंब आत्महत्या केली होती. त्यामुळे दरवर्षी १९ मार्चला संपूर्ण राज्यात एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येत असते. त्यानुसार सर्व शेतकरीपुत्रांनी आपापल्या घरीच एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सर्वप्रथम १९ मार्च २०१७ रोजी शेतकरी नेते अमर हबीब यांच्या नेतृत्वात महागावसह संपूर्ण राज्यभरात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली. त्याच अनुषंगाने शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावे आणि १९ मार्चला शेतकरी स्मृतिदिन म्हणून घोषित करण्यात यावा, या मागण्या यंदाच्या अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आल्या आहेत. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या नियमांचे पालन करीत सर्व शेतकरीपुत्र, व्यापारी, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घरात राहूनच अन्नत्याग आंदोलनात सहभागी व्हावे. या आंदोलनाचे जनक अमर हबीब हे पुणे येथे उपोषण करणार आहेत. वरूड शहरात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिवसीय अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

१९ मार्च रोजी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून तालुक्‍यातील शेतकरीपुत्रांनी अन्नत्याग करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

शासनदरबारी पहिलीच नोंद - 
साहेबराव करपे पाटील हे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण (ता. महागाव) येथील रहिवासी होते. ते तब्बल ११ वर्षे गावाचे सरपंच व १२५ एकर जमिनीचे मालक होते. १९ मार्च १९८६ ला त्यांनी वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात पत्नी मालती, मुलगी विश्रांती, मंगला, सारिका आणि मुलगा भगवान यांच्यासह विषप्राशन करून आत्महत्या केली होती. शासनदरबारी नोंद झालेली ही पहिलीच दखलपात्र शेतकरी आत्महत्या होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com