esakal | खेरडे कुटुंबीयांनी दिलेल्या मानाने भारावले ज्येष्ठ नागरिक...लग्नाचे निमंत्रण देऊन अहेरही भेट

बोलून बातमी शोधा

उमरी पठार : श्रीसंत दोला महाराज वृद्घाश्रमातील वृद्धांना कपड्यांचा अहेर करताना पवन खेरडे यांच्यासह उपस्थित शेषराव डोंगरे व जयप्रकाश डोंगरे.

आयुष्याच्या संध्याकाळी शेकडो वृद्ध वृद्घाश्रमात जीवन जगत असतात. त्यांच्याप्रति सामाजिक जाणीव ओळखून बाभूळगाव तालुक्‍यातील गणोरी येथील खेरडे कुटुंबाने उमरी पठार (ता. आर्णी) येथील श्रीसंत दोला महाराज वृद्घाश्रमातील वृद्धांना लग्नाच्या निमंत्रणपत्रिकेसह अहेराचा पहिला मान दिला.

खेरडे कुटुंबीयांनी दिलेल्या मानाने भारावले ज्येष्ठ नागरिक...लग्नाचे निमंत्रण देऊन अहेरही भेट
sakal_logo
By
बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : बाभूळगाव तालुक्‍यातील गणोरी येथील संजीवनी यादवराव खेरडे यांचे चिरंजीव सुमितचा विवाह अमरावती येथील पूजा ईश्वर माखिजा यांची कन्या चंदा हिच्याशी गुरुवारी (ता. 19) होणार आहे.

खेरडे कुटुंबाने नातेवाइकांसह मित्रमंडळींना लग्ननिमंत्रण दिले. परंतु, लग्नाचा पहिला मान वृद्घाश्रमाला दिला. त्यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.

पाहुण्यांसाठी वाहनाची व्यवस्था

मंगळवारी (ता. 17) वृद्धांना लग्नपत्रिकेच्या निमंत्रणासह आहेर देण्यात आला. वृद्घाश्रमचालक शेषराव डोंगरे, जयप्रकाश डोंगरे यांच्यासह सर्व वृद्धांना लग्नसमारंभाला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली. त्यासाठी खास वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जाणून घ्या : चार दिवस दारू नाही घेतली तर काय बिघडले? दारू दुकाने बंद करण्याची मागणी

117 वृद्धांना दिला अहेर

15 महिलांना साडी, 35 महिलांना लुगडे, चार फेड्या कातळी ओढणी, बंजारा ड्रेस, दहा पुरुषांना शर्ट पायजमा, 53 वृद्धांना शर्ट-धोतर याप्रमाणे 117 वृद्धांना अहेर देण्यात आला. शेषराव डोगरे, जयप्रकाश डोंगरे, राजू जैयस्वाल यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. सर्वांनी नवीन कपडे परिधान करून पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची आग्रहाची विनंती करण्यात आली. यावेळी पवन खेरडे, प्रकाश पांचघरे यांच्यासह नातेवाइक उपस्थित होते.

सामाजिक कार्याचा परिचय
खेरडे कुटुंबीयांनी निराधार असणाऱ्या वृद्घाश्रमातील वृद्धांना पहिला मान दिला. त्यामुळे वृद्ध निराधारांसह आम्ही सर्व भारावून गेलो आहे. या उपक्रमातून त्यांच्या सामाजिक कार्याचा परिचय दिसून येतो.
- शेषराव डोंगरे, वृद्घाश्रमचालक, उमरी पठार.