आनंदवार्ता... पुसदमध्ये हृदयाची पहिली यशस्वी बायपास 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

वेळेत उपचार होऊ न शकल्याने रुग्णाच्या जिवास धोका संभवत होता. ही बाब लक्षात घेऊन मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये हृदयशस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर व आवश्‍यक सुविधा निर्माण केल्या. 

पुसद (जि. यवतमाळ) : वैद्यकीय क्षेत्रात सर्वांत कठीण समजल्या जाणारी हृदयशस्त्रक्रिया पुसदसारख्या ग्रामीण भागात यशस्वीरीत्या करण्याची कामगिरी प्रथमच मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये नवीन वर्षांत पार पडली. ओपन हार्ट शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाल्याने मोठ्या व लांबवरच्या शहरात रुग्णांना जाण्याची आवश्‍यकता राहणार नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

डॉ. वीरेन पापळकर, डॉ. संजय अग्रवाल, डॉ. सतीश चिद्दरवार, डॉ. सुजित चिलकर, डॉ. सचिन तोडकर, डॉ. आनंद कोमावार यांनी या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली. तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. रुग्णांना हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद यांसारख्या शहरांत जावे लागायचे. वेळेत उपचार होऊ न शकल्याने रुग्णाच्या जिवास धोका संभवत होता. ही बाब लक्षात घेऊन मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये हृदयशस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर व आवश्‍यक सुविधा निर्माण केल्या. 

या हॉस्पिटलमध्ये पाच जानेवारीला तुपटाकळी दिग्रस येथील 65 वर्षीय हमीद भाई त्यांच्या हृदयाच्या तीनही नसा (कोरोनरी आर्टरी) 90 ते 100 बंद असल्याने बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. अँजिओप्लास्टी करण्यात हाय रिस्क होती. तब्बल एक तपाचा अनुभव असलेले हार्ट सर्जन डॉ. सुधीर धांडे यांनी त्यांच्या चमूच्या सहकार्याने सकाळी नऊला शस्त्रक्रियेस सुरुवात केली. सहा तास शस्त्रक्रिया चालली. भूलतज्ज्ञ डॉ. आनंद कोमावार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णास रिकव्हरी आयसीयूमध्ये हलविण्यात आले. 

अवश्य वाचा - वडिलांच्या प्रेमाला मुकल्याने तीने केले असे...

तज्ज्ञ चमूने विशेष काळजी घेत रुग्ण आठ दिवसांत चालू लागल्याने सुटी देण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान हृदय तीनदा बंद पडले. मात्र, तत्काळ इंटरनल शॉक देऊन ते सुरू करण्यात डॉक्‍टरांना यश आले. दुसरा रुग्ण सैफुद्दीन (वय 60) अर्धांगवायूचा झटका आल्याने मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मेंदूतील रक्तपुरवठा बंद झाल्याने अर्धांगवायूचा झटका येतो.

डॉ. संजय अग्रवाल यांनी टु-डी इको केला असता, हृदयाच्या डाव्या बाजूला एक दुर्मीळ असणारा ट्यूमर आढळून आला. याचाच एक लहान तुकडा गळून तो मेंदूत गेल्यामुळे रुग्णाला अर्धांगवायू झाल्याचे निदान करण्यात आले. डॉ. धांडे व त्यांच्या चमूने ही ओपन सर्जरी पाच जानेवारीला यशस्वीरीत्या पार पाडली. विशेष म्हणजे या सर्व हृदयशस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आल्या. 
 

शस्त्रक्रिया यशस्वी

 या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 350 कोरोनरी अँजिओग्राफी व 130 अँजिओप्लास्टी सर्जरी यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. याशिवाय ब्रेन, मणके व कॅन्सरच्या अनेक सर्जरी मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या, अशी माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first successful bypass of the heart in Pusad