कोरोनाने केले या व्यवसायालाही `फ्लॅट`; आणले बड्याबड्यांच्या डोळ्यांत पाणी 

flat scheme
flat scheme

चंद्रपूर  : दारूबंदी, नोटाबंदीनंतर आता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने फ्लॅट विक्रीच्या व्यवसायावर मंदीचे सावट पसरले आहे. शहरात तीनशे ते चारशे प्रोजेक्‍ट तयार आहेत. मात्र, ते घेण्यास सध्यातरी ग्राहक उत्सुक नसल्याचे चित्र आहे. ग्राहकांनी फ्लॅट घेण्याकडे पाठ फिरविल्याने बिल्डर्स लॉबीत चिंतेचे सावट आहे. 

औद्योगिकदृष्ट्या संपन्न अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी अनेक छोटे-मोठे उद्योग जिल्ह्यात आले. या उद्योगांमुळे चंद्रपूर शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली. भाड्याच्या घरांचे वाढलेले दर बघता नोकरदारवर्गाचा स्वतःसाठी घर विकत घेण्याचा कल गेल्या काही वर्षांत वाढत चालला आहे. सुरुवातीच्या काळात गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेण्याचा कल अनेकांचा होता. आता मात्र स्वतःसाठी नागरिक फ्लॅट विकत घेऊ लागले आहेत. गेल्या काही वर्षांत जागेचे दर वाढले. घर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत वाढ झाली. त्याचा परिणाम फ्लॅटच्या किमती वाढल्या. वाढीव किमतीतही अनेकांनी फ्लॅटची खरेदी केली. 

व्यवसाय सावरतानाच आला कोरोना 

जिल्ह्यात 2015 रोजी दारूबंदीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर नोटाबंदी, जीएसटीचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही घटकांचा मोठा परिणाम फ्लॅट व्यवसायावर झाला होता. यामुळे फ्लॅटच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. त्यानंतर हळूहळू हे क्षेत्र सावरू लागले. गेल्या काही वर्षांत हा व्यवसाय बऱ्यापैकी सावरला होता. अनेकांचा कल फ्लॅट विक्री होता. त्यामुळे शहरात अनेक प्रकल्प तयार होऊ लागले. मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरला. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून केंद्र शासनाने लॉकडाउन जाहीर केले. लॉकडाउनमुळे गेल्या महिन्याभरापासून उद्योग, छोटे, मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. सदनिका बांधकामाच्या व्यवसायाही लॉकडाउनने प्रभावित झाला आहे. 

ग्राहकांनी फिरविली पाठ 

चंद्रपुरात शहरात 90 च्या आसपास बिल्डर्स आहेत. या बिल्डर्सच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात 300 ते 400 युनिटचे बांधकाम सुरू आहे. यातील काही पूर्णत्वास आले, तर काही पूर्ण होत आहे. सोबतच 30 ते 40 नवीन प्रोजेक्‍टही सुरू होण्याच्या तयारीत आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत अनेक ग्राहकांचा कल नवीन फ्लॅट घेण्याकडे होता. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांनी नवीन सदनिका घेण्याकडे पाठ पाठविली आहे. नोकरदारवर्ग, व्यापारी हे प्रामुख्याने फ्लॅट घेणारे आहेत. मात्र, हातात पैसा नाही. त्यात कोरोनाचे सावट. यामुळे अनेकांनी फ्लॅट घेण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. 

मजुरांच्या टंचाईने बांधकामे रेंगाळणार 

लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर सध्या अनेक मजूर आपापल्या राज्यांत गेली आहेत. ते सध्यातरी परत येण्याची चिन्हे नाही. बांधकामाला लागणारे साहित्यही सध्या मिळणे कठीण झाले आहेत. या सर्वांचा परिणाम बांधकामावर होत आहे. अनेकांनी आपली बांधकामे पुढे ढकलली आहेत. जवळपास आता सप्टेंबर महिन्यात रेंगाळलेली घरांची कामे सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com