बापरे!  पर्लकोटा पुन्हा फुगली.. अख्खा पूल पाण्याखाली.. भामरागडमध्ये प्रशासन अलर्टवर  

लीलाधर कसारे
Friday, 21 August 2020

शनिवारी (ता. 15) रात्री पर्लकोटा नदीने फुगून भामरागडचे जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रशासनाने दक्ष राहून उपाययोजना राबविल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती. पण, बुधवारी (ता. 19) पर्लकोटा नदी दुसऱ्यांदा फुगली.

भामरागड (जि. गडचिरोली) : देशाच्या स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनाच्या सायंकाळपासून आलेला भामरागडचा पूर ओसरून नागरिक सुटकेचा नि:श्‍वास घेत नाही तोच पर्लकोटा नदीचे पाणी पुन्हा चढू लागले असून या नदीवरचा पूल पाण्याखाली गेला आहे. शिवाय शहरात पाणी घुसल्याने बाजारपेठ जलमय झाली असून व्यापारी व नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

शनिवारी (ता. 15) रात्री पर्लकोटा नदीने फुगून भामरागडचे जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रशासनाने दक्ष राहून उपाययोजना राबविल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती. पण, बुधवारी (ता. 19) पर्लकोटा नदी दुसऱ्यांदा फुगली. त्यानंतरही पावसाची रिपरिप वाढत असल्याने आता भामरागड अधिकच जलमय झाले आहे. शुक्रवारी (ता. 21) पूल पाण्याखाली गेला असून शहरातही पाणी घुसले. 

अवश्य वाचा - राणे कुटुंब आत्महत्या प्रकरण! नातेवाईकांनी दिली ही महत्त्वाची माहिती.. गुंता अधिकच वाढला.. चार पथकांची नियुक्ती

त्यामुळे साहित्य हलविण्यासाठी दुकानदार, नागरिकांची धावपळ सुरू झाली. विशेष म्हणजे पर्लकोटा नदीसोबतच इंद्रावती व पामलगौतम या नद्यांनाही पूर आला आहे. मागील वर्षी भामरागड येथे तब्बल सात वेळा पूर आला होता. यंदाही नद्या फुगत असल्याने महापूराची शक्‍यता व्यक्त होत आहे. सध्या पर्लकोटा नदीचे पाणी झपाट्याने वाढत असून स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

प्रशासन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे व अन्य बचाव कार्य करत आहे. मागील दहापेक्षा अधिक दिवसांपासून भामरागडसह जिल्हाभरात पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसाला विशेष जोर नसला, तरी पर्लकोटा, पामलगौतम या नद्या भामरागड येथे इंद्रावती नदीला मिळतात. पुढे इंद्रावती गोदावरीला भेटायला जाते. पण, तेलंगणा सरकारने मेडीगड्डा प्रकल्पाची निर्मिती करून महाकाय धरण उभारले आहे. त्यामुळे इंद्रावतीचा नैसर्गिक प्रवाह बदलत आहे. पुढे जाणारे इंद्रावतीचे पाणी मागे सरत असून दाब वाढल्याने तिला इकडे मिळणाऱ्या पर्लकोटा, पामलगौतम, बांडीया या नद्या व जोडलेले नाले फुगत आहेत. त्यामुळे स्थिती अधिकच बिकट होत आहे.

सविस्तर वाचा - मौजमजा करताना ‘ते’ बनले नावाडी, हाकली नाव आणि स्वतःचा ठरले कर्दनकाळ...

उत्तर भागातही पूर 

जिल्ह्याच्या दक्षिण भागात भामरागड, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा आदी तालुक्‍यांत पूरपरिस्थिती असताना कोरची, आरमोरी या तालुक्‍यांतही काही भागांत नद्या फुगल्या आहेत. कोरची तालुक्‍यातील रामगड, पुराडा येथे जोरदार पाऊस आल्याने रस्ते व शेते जलमय झाली आहेत. आरमोरी तालुक्‍यातील वैरागड येथे नदी, नाल्यांना पूर आल्याने महिलांनी खोब्रागडी नदीच्या पुरातच गौरीपूजन केले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood in Bhamaragadh in Gadchiroli district again