esakal | आस्का एलईडी लाइटच्या प्रकाशाने मिळवता आले भामरागडच्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण...वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

भामरागड (जि. गडचिरोली) : आस्का एल.ई.डी. लाइटसोबत प्रशासनाची चमू.

१६ ऑगस्ट रोजी पर्लकोटा नदीला महापूर आला. पुराचे पाणी भामरागडच्या मुख्य बाजारपेठेत घुसले. सर्वत्र धावपळ सुरू झाली. इतर कोणालाही अनुभव नसताना स्वत: नायब तहसीलदार प्रकाश पुप्पुलवार यांनी प्रयत्न करून आस्का एलईडी लाइट सुरू केला. त्यामुळे चौकापासून पर्लकोटा नदीपर्यंतचा भाग प्रकाशमान झाला व प्रशासनाला पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले.

आस्का एलईडी लाइटच्या प्रकाशाने मिळवता आले भामरागडच्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण...वाचा सविस्तर

sakal_logo
By
लीलाधर कसारे

भामरागड (जि. गडचिरोली) : यंदा पहिल्यांदाच आलेला गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचा पूर भामरागडातील नागरिकांसह प्रशासनालाही हवालदिल करून गेला. पुरामुळे नदीचे पाणी पुलावरून वाहत असताना वीजपुरवठाही खंडित झाला होता. आता मिट्ट काळोखात मदत करायची तरी कशी? या विवंचनेत प्रशासनाची चमू असताना अचानक त्यांना तहसील कार्यालयाला मिळालेल्या आस्का एलईडी लाइटची आठवण झाली.

महत्प्रयासाने हा लाइट प्रकाशित होताच पर्लकोटा नदीपासून थेट चौकापर्यंतचा परिसर उजळून निघाला. त्यामुळे पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास पथकाला बरीच मदत झाली.

१६ ऑगस्ट रोजी पर्लकोटा नदीला महापूर आला. पुराचे पाणी भामरागडच्या मुख्य बाजारपेठेत घुसले. सर्वत्र धावपळ सुरू झाली. व्यापारी मिळेल त्या साधनांनी आपापल्या सामानाची आवराआवर करून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ लागले. दिवसभर पुराचे पाणी वाढतच होते. सायंकाळ झाली तसा अंधार पडू लागला. दोन दिवसांपासून वीज नव्हतीच. अंधारात पूरपरिस्थितीवर नियंत्रण कसे ठेवायचे, हा प्रश्‍न प्रशासनाला भेडसावू लागला.

लाइटच्या प्रकाशाने उजळले भामरागड

अशातच काहीतरी वस्तू तहसील कार्यालयाच्या स्टोअर रूममध्ये असल्याचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांना आठवले. त्यांनी ही बाब नायब तहसीलदार प्रकाश पुप्पुलवार यांना सांगितली. पुप्पुलवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्टोअर रूमकडे धाव घेत ती अनोखी वस्तू बाहेर काढली. ती वस्तू होती आस्का एलईडी लाइट! लगेच भामरागडच्या मुख्य चौकात हा लाइट आणून बरीच खटपट करून तो सुरू करण्यात आला. या महाकाय लाइटचा प्रकाश एवढा होता की चौकापासून थेट पर्लकोटा नदीपर्यंत सर्व स्पष्ट दिसत होते.

धूळखात पडलेली वस्तू आली कामी

त्यामुळे विजेअभावी अंधारात चाचपडणाऱ्या बचाव पथकाला मदत मिळून रात्रीच्या वेळी पूरपरिस्थितीवर नजर ठेवत नियंत्रण ठेवता आले. आस्का एलईडी लाइट मागील दोन वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या स्टोअर रूममध्ये धूळखात पडून होते. मात्र त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते. या लाइटचा वापर कसा करायचा याचेही कोणालाच ज्ञान नव्हते. तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी नायब तहसीलदार प्रकाश पुप्पुलवार यांना स्टोअर रूममध्ये काहीतरी वस्तू असल्याचे सांगितले. पुप्पुलवार यांनी ती वस्तू बघितली, तर आस्का एलईडी लाइट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या लाइटचा वापर आपण यापूर्वी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

पूरपरिस्थितीवर नियंत्रण

इतर कोणालाही अनुभव नसताना स्वत: पुप्पुलवार यांनी प्रयत्न करून हा लाइट लावला. चौकापासून पर्लकोटा नदीपर्यंतचा भाग प्रकाशमान झाला व प्रशासनाला पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. यावेळी तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, नायब तहसीलदार पुप्पुलवार, नायब तहसीलदार अनमोल कांबळे व व्यापारीवर्गाची उपस्थिती होती.

जाणून घ्या  :  सतर्क रहा! सप्टेंबर महिन्यात वाढू शकतो कोरोनाचा कहर.. या मंत्र्यांनी केले जनतेला आवाहन.. वाचा सविस्तर

जिल्ह्यात सरासरी २३.६ मिलिमीटर पावसाची नोंद

जिल्ह्यात सोमवार (ता. १७)पासून पावसाने उसंत दिली असली; तरी अधूनमधून शिडकावा सुरूच आहे. भामरागड तालुक्‍यातील पूर ओसरत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ६९.२ मिलिमीटर पाऊस अहेरी तालुक्‍यात पडला. त्याखालोखाल भामरागड तालुक्‍यात ५२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वांत कमी १.५ मिलिमीटर पाऊस देसाईगंज तालुक्‍यात पडला.
 

(संपादन   :  दुलिराम रहांगडाले)