esakal | गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजूनही संततधार! अनेक गावांचा तुटला संपर्क
sakal

बोलून बातमी शोधा

rain

सिरोंचा-असरअली-जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरील असरलीच्या पुढे सोमनपल्ली नाल्याला पूर आल्याने हा राष्ट्रीय महामार्ग तसेच आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग १३० डी बंद करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजूनही संततधार! अनेक गावांचा तुटला संपर्क

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागात सुरू असलेले पावसाचे तांडव अद्याप थांबले नसून या परिसरातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड हे तालुके पुराच्या सावटात आहेत. विशेष म्हणजे भामरागड व एटापल्ली तालुक्‍याला पुराचा फटका अधिक बसला असून या दोन्ही तालुक्‍यांतील अनेक गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे.

सतत नऊ दिवसांपासून सुरू असलेला पाऊस, सिरोंचा तालुक्‍यात निर्माण झालेला अवाढव्य मेडीगड्डा प्रकल्प, त्यामुळे रोखलेल्या प्रवाहाने फुगलेल्या नद्या, ठेंगणे पूल, खराब रस्ते या सर्व एकत्रित समस्या संकट रूपात या परिसरातील नागरिकांवर कोसळत आहेत. भामरागड शहराला जोडणारा पर्लकोटा नदीवरील पूल अद्याप पाण्याखालीच आहे. शहरातील पुराचे पाणी ओसरले असले, तरी पाऊस सुरूच असल्याने जलपातळी वाढण्याची शक्‍यता आहे. प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात असून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधीक्षक तसेच इतर अधिकारी, कर्मचारी पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत. दरम्यान एटापल्ली तालुक्‍यात ९० पेक्षा अधिक गावांना पाण्याने वेढले असल्याने त्या गावांचा जगाशी संपर्क तुटला असून नागरिकांना प्रशासकीय यंत्रणेकडून फारशी मदत मिळत नसल्याने येथील नागरिक संकटात सापडले आहेत.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे गट्टा नाला, बांडे नदी, गर्देवाडा नाला, झुरी नाला, जाजावंडी नाला, एकरा नाला, अशा नदीनाल्यांना पूर आल्यामुळे तालुक्‍यातील १९८ गावांपैकी एकरा खुर्द, पेठा, बांडे, गट्टा, गर्देवाडा, वांगेतुरी, वटेली, मेडरी, कोइनवशी, बेसेवाड़ा, मुरेवाड़ा, गट्टागुडा, वटेली, कुदरी, नागुलवाडी, रेगादंडी, पिपली, बुर्गी, मोहर्ली, हेटळकसा, मेडरी, मर्दाकोई, जिजावंडी, जवेली खुर्द, कोरेनार, पुसूमपल्ली, आसावंडी, कोटमी, घोटसून, कारका, गुंडाम, इत्तलनार, भूमकान, वेळमागड, कुंडूम, रेकनार, झारेवाडा, पुस्कोटी, कुंजेमर्का, नैताला अशा ९० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय अहेरीतील गडअहेरी नालाही दुथडी भरून वाहतो आहे.

सिरोंचा-असरअली-जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरील असरलीच्या पुढे सोमनपल्ली नाल्याला पूर आल्याने हा राष्ट्रीय महामार्ग तसेच आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग १३० डी बंद करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - अरेरे... मुलींच्या लग्नाचे सुख पाहण्याआधीच मृत्यूने कवटाळले, जाणून घ्या सविस्तर घटना

संकटावर संकट...
कोरोना महामारीत शासनाने घोषित केलेल्या टाळेबंदी व संचारबंदीमुळे मार्च महिन्यापासून ग्रामीण भागातील कुटुंब गावातच बंदिस्त झाली आहेत. त्यांनी जीवनावश्‍यक वस्तू व इतर साहित्याची गरजेनुसार खरेदी केलेली नाही. कोरोनाचे संकट डोक्‍यावर असतानाच आता संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

संपादन - स्वाती हुद्दार