हा प्रकल्प ठरतोय पूराचे कारण! जनजीवनच जलसंकटात

river
river

गडचिरोली : तेलंगणा राज्याने सिरोंचा तालुक्‍यात निर्माण केलेल्या अतिविशाल मेडीगड्डा प्रकल्पामुळे तेलंगणाला समृद्धी मिळत असली, तरी महाराष्ट्रात मात्र संकट ओढवत आहे. हे महाकाय धरण ज्या गोदावरी नदीवर बांधले आहे त्या नदीला जिल्ह्यातील इंद्रावती, प्राणहिता या मोठ्या नद्या जुळलेल्या आहेत. या नद्यांच्या धरणाला अडणाऱ्या पाण्याच्या दबावामुळे नद्या फुगून जलसापळा तयार होतोय. त्यामुळेच भामरागड येथे फार मुसळधार पाऊस कोसळला नसतानाही पर्लकोटा नदी फुगून येथील पूल बुडाला असून अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे बोलले जात आहे.

गडचिरोली जिल्हा हा नद्यांच्या जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तर-पश्‍चिम आणि दक्षिण -पूर्व सीमेवरून वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या पाच महत्त्वाच्या नद्या वाहतात. वैनगंगा नदी जिल्ह्याच्या आरमोरी, गडचिरोली व चामोर्शी या तालुक्‍याच्या पश्‍चिम सीमेवरून वाहत चामोर्शी तालुक्‍यातील चपराळा येथे वर्धा नदीला मिळते. या दोन्ही नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता नदी या नावाने म्हणून ओळखले जाते. ही नदी पुढे जिल्ह्याच्या पश्‍चिम सीमेवरून वाहत जाऊन सिरोंचा येथे गोदावरी नदीला मिळते. इंद्रावती नदी सिरोंचा, एटापल्ली आणि अहेरी तालुक्‍याच्या दक्षिण-पूर्व सीमेवरून वाहत जाऊन सिरोंचा तालुक्‍यातील सोमनूरजवळ गोदावरी नदीस मिळते. तसेच वेगवान प्रवाह असणाऱ्या बांडीया, पर्लकोटा आणि पामलगौतम या नद्या इंद्रावतीस मिळतात.

सध्या ज्या भामरागड तालुक्‍यात पूर आला आणि जो पूल बुडाला अगदी त्या पुलाच्या काही अंतर पुढेच इंद्रावती, पर्लकोटा आणि पामलगौतम या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. येथून पुढे जाणारे इंद्रावतीचे पाणी धरणामुळे अडत असल्याने कमी पावसातही पूरपरिस्थिती निर्माण होत आहे.

शिवाय इंद्रावती नदीमुळेच एटापल्ली तालुक्‍यालाही पुराचा फटका बसला. याशिवाय गाढवी, खोब्रागडी, कठाणी, वैलोचना आणि दिना या नद्या जिल्ह्याच्या उत्तर भागात वाहतात. त्यापैकी पहिल्या चार नद्या वैनगंगेस, तर दिना नदी प्राणहिता नदीस मिळते. अशा प्रकारे गडचिरोली जिल्हा उत्तर-पश्‍चिम व दक्षिण -पूर्व या दिशांना पाच मोठ्या नद्यांनी वेढलेला असून इतर नद्या आणि नाले जिल्ह्याच्या विविध भागांत वाहत असल्यामुळे सतत पाऊस पडल्यास पूर परिस्थिती निर्माण होते.

मेडीगड्डा प्रकल्पाच्या निर्मितीच्या वेळेस अनेक बाबींसह या बाबींकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत परवानगी देण्यात आली. या धरणाचे पूर्ण नियंत्रण तेलंगणा राज्याकडे असल्याने ते त्यांच्या सोयीनुसार धरणाचे दरवाजे उघडतात. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासाठी हे धरण जलसापळा ठरत आहे.

सविस्तर वाचा - हड्डीजोड की कंबरमोड? या गावात घरोघरी आहेत दवाखाने.. पण सत्य मात्र भलतेच...

कैचीत अडकलेला जिल्हा
गडचिरोली जिल्हा एकीकडे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्प आणि दुसरीकडे तेलंगणा राज्यातील मेडीगड्डा प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांच्या कैचीत अडकला आहे. पावसाळ्यात गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू होताच जिल्ह्याच्या उत्तरेकडील नद्या पाऊस कमी असताना किंवा पाऊस नसतानाही फुगतात. त्यामुळे या नद्यांच्या काठावरील गावांना नेहमीच पुराचा धोका असतो. सिंचनाचा अभाव असलेल्या या जिल्ह्याच्या डोक्‍यावर पुराची टांगती तलवार नेहमीच असते.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com