esakal | हड्डीजोड की कंबरमोड? या गावात घरोघरी आहेत दवाखाने.. पण सत्य मात्र भलतेच.. 
sakal

बोलून बातमी शोधा

this village has clinics in every home read truth behind this

पळसगाव/सोनका येथे पूर्वी वैद्यराज शंकरजी मौजे हे मोफत तुटलेली हाडे जोडण्यासाठी उपचार करत होते. जडीबुटींसोबत जवस तेल आणि कापडाची पट्टी वापरून ते हाडे जोडत होते.

हड्डीजोड की कंबरमोड? या गावात घरोघरी आहेत दवाखाने.. पण सत्य मात्र भलतेच.. 

sakal_logo
By
निश्‍चय रामटेके

गोंडउमरी (जि. भंडारा) : साकोली तालुक्‍यातील पळसगाव/सोनका हे गाव राज्यात हड्डीजोडण्याच्या उपचारासाठी प्रसिद्ध झाले आहे. आताही वेगवेगळ्या अवयवांची हाडे जोडण्यासाठी बाहेर गावाहून येणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे येथे घरोघरी हड्डीजोड दवाखाने तयार झाले आहेत. येथेप्रत्येक गल्लोगल्ली व वॉर्डातील दवाखान्यात लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. आता कोरोना संकटामुळे दवाखाने बंद असली तरी, गरजूंना एकांतात बोलावून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

पळसगाव/सोनका येथे पूर्वी वैद्यराज शंकरजी मौजे हे मोफत तुटलेली हाडे जोडण्यासाठी उपचार करत होते. जडीबुटींसोबत जवस तेल आणि कापडाची पट्टी वापरून ते हाडे जोडत होते. त्यांनी हजारो रुग्णांची सेवा केल्यामुळे या गावाची जिल्ह्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाली. या उपचारामुळे शस्त्रक्रियेचा खर्चात बचत होत असल्याने रुग्णांचे नातेवाईक त्यांना आपल्याकडून भेट स्वरूपात वस्तू व पैसे देत होते. 

अधिक माहितीसाठी -  ‘तू प्रेमविवाह केला ना, मग पतीला का सोडले?' वडिलांनी हा प्रश्न विचारताच मुलगी चिडली अन्...

घरोघरी हड्डीजोड दवाखाने

कालांतराने श्री. मौजे यांचे देहावसान झाले. मात्र, त्यांची उपचार पद्धती साधी सोपी असल्याने त्यांच्यासोबत काम करणारे अनेक सहकारी, त्यांची मुले, नातेवाईकांनी आपणसुद्धा हाडेजोडू शकतो, असा दावा करत आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. या उपचारासाठी जवसतेल, खादीच्या पट्टीचा वापर केला जातो. त्यात झाडपत्ती, जडीबुटीचा वापर केला जातो. त्यावर एका रुग्णाच्या मागे 100 रुपये खर्च येतो. मात्र, येथील हाडवैद्य प्रत्येक रुग्णाकडून एक ते दीड हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतात. या गावात व्यवसायाची डिग्री किंवा डिप्लोमा मिळवणारा एकही डॉक्‍टर नाही. परंतु, घरोघरी हड्डीजोड दवाखाने थाटलेले आहेत.

एजंटचा सुळसुळाट

बाहेर गावाहून येणाऱ्या गाडीवाल्यांना कमिशन देऊन येथे एजंट तयार केले आहेत. येथे रुग्णाला पट्टी लावणारे लाखो रुपये कमावत आहे. गावात मोठ्या प्रमाणात हड्डीजोड दवाखाने सुरू झाले आहे. एकाने तर, हाडांची तुटफुट समजावी म्हणून त्याच्या घरीच क्ष-किरण मशीनही लावले आहे. दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात अनेकांनी व्यवसाय बंद ठेवला आहे. मात्र, काही स्वार्थी वैद्य रुग्णांना फोन करून गावाच्या बाहेर शेतात बोलावतात. तेथे उपचार करून हजारो रुपये लुबाडतात. पळसगाव येथे विश्‍वासाने येणाऱ्यांना लुबाडण्याचा गोरखधंदा फोफावला आहे. येथे उच्च शिक्षित, व्यावसायिक आणि नोकरदारांचे नातेवाईक येतात. परंतु, आजपर्यंत एकानेही येथील वैद्यांकडे साधे प्रमाणपत्रांची चौकशी केली नाही. आरोग्य विभागाने अधिकारी व कर्मचारी मुकाट्याने हा प्रकार पाहत असतात.

कोरोना संकटात येथील दवाखाने लॉकडाउन झाले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रभाव संपल्यावर पुन्हा गावात तुटलेली हाडे जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होण्याचे शक्‍यता आहे. काहीही असले तरी, आमचे पळसगाव हड्डीजोड केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

हेही वाचा - राज्यातील हजारो शिक्षकांना कसा मिळणार दिलासा ?...वाचा सविस्तर

आर्थिकदृष्टया रुग्णांचे मोडते कंबरडे 

राज्यातील शेगाव, जालना, औरंगाबाद, जळगाव, भुसावळ, नाशिक, शिर्डी, पंढरपूर, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणाहून नागरिक येथे हड्डीजोडण्यासाठी येतात. या रुग्णांचा गैरफायदा घेऊन ज्यादा रक्कम उकळली जाते. येथे हड्डीजोड रुग्णांची मोठ्या प्रमाणात लुटमार केली जाते. त्यामुळे भारतीय वैद्यकीय संघटनाने या गावातील अवैध उपचार केंद्राकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. आरोग्य विभागाने याची सखोल चौकशी करून हा गोरखधंदा बंद करावे, असे येथील नागरिकांची मागणी आहे.


संपादन - अथर्व महांकाळ