
अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा मोह वृक्ष हा कल्पवृक्षच आहे. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल यातून होत असते. परंतु, बंदी उठली तरी प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात नसल्याने छुप्या मार्गाने मोहफूल विक्री केली जात आहे. दरवर्षी मार्च ते मे या कालावधीत मोहाच्या झाडाला फुले येतात.
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांसह अन्य जिल्ह्यात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. एका झाडापासून सुमारे 50 किलो फुले मिळतात. ही फुले साधारणत: 20 ते 25 रुपये प्रतिकिलो दराने विकली जातात. एकट्या गोंदिया जिल्ह्यात या झाडातून अंदाजे 100 टन फुलांचे उत्पादन होते. पंचवीस रुपये प्रतिकिलोचा हिशोब केला; तर हा आकडा कोट्यवधींच्या घरात जातो.
इतक्या प्रचंड प्रमाणात फुलांचे उत्पादन होत असले; तरी पूर्व विदर्भात त्यावर आधारित एकही प्रक्रिया उद्योग नाही. राज्यात ऊस द्राक्षापासून दारू तयार केली जाते, त्या दारूला शासनाची मान्यता आहे. परंतु, हीच दारू मोहफुलापासून तयार केली तर त्याला शासनाकडून मान्यता मिळत नाही हा विरोधाभास आहे.
ग्रामीण भागात ज्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही ते मोहफुलाच्या दारूचा व्यवसाय करतात. यात प्रामुख्याने महिलांचा समावेश असतो. घरात कर्ता पुरुष नसल्याने नाइलाजाने त्यांना हा व्यवसाय करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. मोहवृक्षांचे संगोपन करण्यासाठी कुठलाही खर्च येत नाही. पावसाच्या पाण्यावरच ते वर्षभर जगतात. कोणतेही उत्पादन खर्च नसताना हा मोहवृक्ष शासन दरबारी दुर्लक्षितच राहिला आहे.
गोंदिया जिल्ह्यात मोहफुलांचा वापर मुख्यत्वे दारू काढण्यासाठी केला जातो. साधारणत: पंचवीस रुपये प्रतिकिलोप्रमाणे या फुलांची विक्री होते. परंतु लॉकडाउनमुळे शौकिनांचा कल मोहफुलाच्या दारूकडे वळला. कधी नव्हे इतकी मोहफुलाच्या दारूची विक्री मागील दीड महिन्यात झाली. त्यामुळेच मोहफुलाचे भावही प्रचंड वाढविण्यात आले. पंचवीस रुपये किलोप्रमाणे मिळणारे मोहफूल आता जवळपास 40 ते 50 रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. परिणामी मोहफुलाच्या दारूचे दरसुद्धा वाढले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात उद्योगांची वानवा असल्याने येथे बेरोजगारांची मोठी फौज आहे. हाताला काम नसल्याने बहुतांश जण दारू तस्करी, वाळू तस्करी अशा अवैध मार्गात गुंतलेले आहेत. या जिल्ह्यात मोहफुलावर आधारित उद्योगासाठी पोषक वातावरण असून लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यातून रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.