rovani.
rovani.

पारंपरिक लोकगीतांच्या सुरेल स्वरांनी सजतो भात रोवणीचा उत्सव!!

नागभीड(जि. चंद्रपूर) : विदर्भातील गोंदिया,चंद्रपूर,भंडारा,गडचिरोली जिल्हे धानासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या भात रोवणीचा हंगाम सुरू आहे.
बळीराजा मे महिन्यात आपल्या शेतीला नांगरणी वखरणी करून सजवतो. त्यानंतर जून मध्ये हलक्‍या पावसाचे आगमन होताच शेतात पेरणी करतो आणि भाताच्या पऱ्याची वाढ होते. पावसाने साथ दिली तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात रोवणीला सुरवात होते. आता शेतीची नांगरणी, वखरणी, चिखलटीचे टक्के काम 90 यंत्राने होतात. परंतु अपवाद वगळता शंभर टक्के रोवनी महिलांच्या हातून होते. रोवणी करताना ओव्या, पारंपरिक लोकगीते, भजन, अभंग या महिलांच्या मुखातून बाहेर पडतात. यावेळी कधी पाऊस तर कधी पक्षी गोड आवाजाने त्यांना साथ देतात. रोवणीचे काम हसत खेळत करण्यासाठी पारंपरिक गीतांचा सुरेख वापर केला जातो.

रोवणीच्या दिवशी महिला पहाटेच उठतात. सर्व कामे आणि स्वयंपाक करून टोपल्यात दुपारच्या जेवणाची शिदोरी घेऊन शेताच्या दिशेने निघतात. सोबत पावसापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकचे कापड कमरेला असते. रोवणीचे काम करताना महिलांकडून पारंपरिक गीतांची मैफल रंगते. यात नवरा बायकोतील प्रेम-दुरावा, बहीण-भावातील प्रेमाचे नाते, विविध सण-समारंभ, शेत मालकाच्या भलाईचे साकडे मागणारे गीत साक्षात देवाकडे पोहोचेल असे गायले जाते.

बयनाई पुसते भायाला भायला,
बयनाई पुसते भायाला
तुझे नांगर कितीक गा तुझे नांगर कितीक
त्यावर भाऊ उत्तर देते 'साठ बाई शंभर हजार'

यात शेतकरी राजा असलेल्या आपल्या भावाला बहीण मोठ्या आस्थेने विचारपूस करते. ती जरी संसारात गुंतली असली तरी माहेरबद्दलचे तिचे प्रेम या गीतातून व्यक्त होते.

नांगर वखर सोडा साई
मज बंधू नेवा आले धाडता का नाई.
माहेरी जाण्यासाठी पतीची मनधरणी करण्यासाठी हे गीत ती गात असते...!!
कोण कोण धानाच्या बिवडीत
शबरी धानाच्या बिवडीत.. अशा प्रकारच्या गीतातून संपूर्ण धानाच्या प्रजाती गाण्यात घेऊन आपल्या पतीची प्रगती विचारत असते.
तुमचा सेला कावून पिवळा
राया कावून पिवळा
तुळशी बागेत स्वयंवर झाला असा जाब सुद्धा ती आपल्या पतीला विचारत असते....
विठ्ठल विटेवरी उभा कसा
ग उभा कसा,

कमलपुष्पेचा फुल जसा हे विठुरायचे गोडवे गाणारे भजन ऐकताच सगळे भक्तीत दंग होऊन जातात. यात इतर महिलांचा कोरस सुद्धा अचूक लागतो. या खेरीज असंख्य अभंग, भजने गायली जातात. विविध कथा सांगितल्या जातात. संसारी सासुरवास भोगणाऱ्या आपल्याच सखीचे समुपदेशनच या शेताच्या बांधावर केले जाते आणि संपूर्ण दिवस अगदी मजेत घालवला जातो...!!
यात सर्वांत भाव खाऊन जाणारी गोष्ट म्हणजे, रोवायला आलेली महिला जर बाळंतीण असेल. तिचे लेकरू दुधावरचा असेल तर तिला दुपारी बाळाला स्तनपान करण्यासाठी घरी पाठवले जाते. दुपारी डब्यातून आणलेल्या भाज्या एकमेकांनी देत बांधावर कांद्याच्या फोडीची व आंब्याच्या लोणच्याची चव घेत जेवण केले जाते.. जर पाऊस जोराचा असेल तर डबे हातात घेऊन अंगावर प्लॉस्टिक कापड घेवून 'बुफे' पद्धतीने जेवण केले जाते.. आधुनिक कार्यक्रम प्रसंगी असलेली 'बुफे' जेवणाची पद्धती ही या शेतमळ्यातुन तर आली नसावी ना.?

सविस्तर वाचा -  अशी आहे शेतकरी कन्येची यशोगाथा! एकाच वर्षी राज्य सेवा आयोगाच्या दोन परीक्षा उत्तीर्ण

शेवटी शेतातील रोवनी संपली की सर्व महिला बांदी मधील चिखल शेतमालक व मालकिणीला लावतात. प-यांची एक पेंढीची पूजा करून तिला चिखलात गाळून धन धान्य भरपूर होऊ दे अशी प्रार्थना करतात. शेतमालकाच्या घरी मालकाचे पाय धुवून त्याचे औक्षण करून शेती अवजाराची पूजा केली जाते. घरच्या भिंतीवर शेतातून आणलेल्या चिखलाने फन, नांगर, धान्य साठवणारे ढोले, शेतकरी माणूस आणि बाई यांचे चित्र काढले जाते...!! शेतमालक आपल्या ऐपतीनुसार चहा,चिवडा,गोड देऊन निरोप देतो तर मोठे शेतकरी जेवण देऊन निरोप देतात... ही संस्कृती आजही या चार जिल्ह्यातील धान पट्ट्यात बघायला मिळते.  

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com