प्रसिद्धीकडे दुर्लक्ष करून कामगिरीवर फोकस करा

छायाचित्र
छायाचित्र


नागपूर: आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एखादे पदक जिंकले की खेळाडू हवेत उडतो. वर्तमानपत्रांमध्ये नाव आल्यानंतर त्याला जणू आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटते. खेळाडूने त्याला मिळणाऱ्या "पब्लिसिटी'कडे लक्ष न देता आणखी कठोर मेहनत करून चांगली कामगिरी करण्यावर भर दिला पाहिजे. तरच तो खेळाडू आयुष्यात "लंबी रेस का घोडा' होऊ शकतो, असा शहाणपणाचा सल्ला माजी ऑलिम्पिकपटू अर्जुन पुरस्कारविजेते गोपाल सैनी यांनी नागपूर व विदर्भातील युवा खेळाडूंना दिला. नागपूर जिल्हा हौशी ऍथलेटिक्‍स संघटनेतर्फे गुरुवारी आयोजित पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम करणारे सैनी म्हणाले, एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविले की, तो अचानक प्रसिद्धीच्या झोतात येतो. प्रसारमाध्यमांकडून मिळणाऱ्या अमाप प्रसिद्धीमुळे त्याच्यातील भूक कमी होते. परिणामत: तो आपल्या कामगिरीवर पूर्णपणे "फोकस' करू शकत नाही. त्यामुळे काळाच्या ओघात त्याच्या कामगिरीला उतरती कळा लागते. खेळाडूने अशा गोष्टींपासून नेहमी स्वत:ला दूर ठेवले पाहिजे, तरच तो उंच शिखर गाठू शकतो. आजच्या युवा खेळाडूंमध्ये जिद्द व समर्पणवृत्तीचा अभाव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वीच्या काळातील खेळाडू प्रचंड मेहनती होते. त्यांच्यात एकप्रकारचे पागलपण पाहायला मिळायचे. तासनतास खेळाच्या मैदानावर राहायचे. दुर्दैवाने ते चित्र अपवादात्मक परिस्थितीतच पाहायला मिळते. अशा परिस्थितीत कधीही "चॅम्पियन' खेळाडू घडत नसतो. डोळ्यासमोर लक्ष्य ठेवून त्यावर पूर्णपणे केंद्रित करणारा खेळाडूच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.
दोहा येथे सुरू असलेल्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील भारतियांच्या कामगिरीवर समाधान व्यक्‍त करताना सैनी म्हणाले, जागतिक किंवा ऑलिम्पिकसारख्या अतिशय "टफ' स्पर्धांमध्ये पदक जिंकणे निश्‍चितच सोपी गोष्ट नाही. त्याही परिस्थितीत काही खेळाडूंनी आपली संपूर्ण ताकद झोकून चांगले प्रदर्शन केले. पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही पदक मिळविणे भारतीय ऍथलिट्‌ससाठी अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली तरीदेखील आमच्यासाठी ती आनंद व समाधानाची बाब राहणार आहे. क्रीडा क्षेत्रातील वाढत्या "डोपिंग'बद्दल विचारले असता ते म्हणाले, आजच्या घडीला "डोपिंग' निश्‍चितच चिंतेची बाब आहे. त्यासाठी खेळाडू जितका दोषी आहे, तितकाच त्याचा प्रशिक्षकही. इंटरनेटवर सर्वकाही उपलब्ध असूनही अनेकवेळा जाणूनबुजून असले प्रकार केले जातात. भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघ या दिशेने चांगले काम करीत असल्यामुळे या प्रकारांना भविष्यात नक्‍कीच आळा बसणार आहे.
याप्रसंगी जिल्हा संघटनेचे चेअरमन उमेश नायडू, सचिव डॉ. शरद सूर्यवंशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीजीटीडी विभागप्रमुख डॉ. माधवी मार्डीकर, डॉ. संजय चौधरी, राम वाणी, गुरुदेव नगराळे, राम वाणी, विवेक सिंग आदी उपस्थित होते.

ज्युनियर स्तरावर लक्ष देण्याची गरज
1980 साली सोव्हिएत युनियनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सैनी यांच्या मते, मुळात खेळाडू हा ज्युनियर स्तरावर घडविला जातो. छोट्या रोपट्याचे कशाप्रकारचे जतन केले जाते, त्यावर भविष्यकाळ ठरत असतो. त्यामुळे ज्युनियर स्तरावर खेळाडूवर अधिक लक्ष केंद्रित करणे खूप आवश्‍यक आहे. प्रतिभावान युवा खेळाडूंना चांगल्या सोयीसुविधांसोबतच आधुनिक प्रशिक्षण व तज्ज्ञ मार्गदर्शक मिळाल्यास नक्‍कीच दर्जेदार खेळाडू तयार होऊ शकतात.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com