esakal | दिवसा वनभ्रमंती, रात्रीला मचाणावर जागरण; तेव्हा कुठं पिंजऱ्यात अडकला वाघोबा
sakal

बोलून बातमी शोधा

forest department efforts to capture cannibal tiger in rajura of chandrapur

राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाला ठार करा, अशी मागणी स्थानिक संतप्त शेतकऱ्यांनी केली होती. परिसरातील २२ गावांमधील शेतकरी दहशतीखाली जीवन जगत होते. खरीप हंगामाचा शेवट असल्यामुळे शेतकरी चिंतातुर होते.

दिवसा वनभ्रमंती, रात्रीला मचाणावर जागरण; तेव्हा कुठं पिंजऱ्यात अडकला वाघोबा

sakal_logo
By
आनंद चलाख

राजुरा (चंद्रपूर): मध्य चांदा वन विभागांतर्गत धुमाकूळ घालणाऱ्या व दहा शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला वनविभागाने अखेर जेरबंद केले. 27 ऑक्टोबरला राजुरा तालुक्यातील सिंधी वनपरिक्षेत्रात नलफडी जंगल शिवारामध्ये वाघ पिंजऱ्यात जेरबंद झाला आणि नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या मोहिमेतील सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तब्बल दोन आठवड्यापासून उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी मोहिमेची धुरा स्वतः सांभाळली. दिवसा 10 ते 12 किलोमीटर वनभ्रमंती आणि रात्रीला मचाणावर जागरण करून वाघावर नजर ठेवण्याचे काम येथील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळेच नरभक्षी वाघ जेरबंद झाला.

या मोहिमेचे नेतृत्व मुख्य वनसंरक्षक प्रविणकुमार व उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी केले. उपविभागीय वनाधिकारी अमोल गरकल, वनपरिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचारी यांच्या पथकासोबत मोहीम गतिमान करण्यात आली. कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुन्हा मोहिमेला गती दिली. उपवन संरक्षक अरविंद मुंढे यांनी नेतृत्व करीत उपविभागीय वनअधिकारी अमोल गरकल, वनकर्मचाऱ्यांच्या पथकासोबत गस्त घालणे व रात्री वाघाच्या शोधात मचाणावर जागरण करणे, असा दिनक्रम सुरू झाला. वाघ सावध झाल्याने वनविभागाने अनेक प्रयोग केले. मात्र, वाघाने वारंवार हुलकावणी दिली. अखेर वाघाला जेरबंद करण्यास वन विभागाला यश प्राप्त झाले.

हेही वाचा - दुबार पेरणी करूनही सोयाबीन सडलंय, आता चण्याचीही तीच स्थिती; आम्ही जगायचं कसं?

राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाला ठार करा, अशी मागणी स्थानिक संतप्त शेतकऱ्यांनी केली होती. परिसरातील २२ गावांमधील शेतकरी दहशतीखाली जीवन जगत होते. खरीप हंगामाचा शेवट असल्यामुळे शेतकरी चिंतातुर होते. शेतावर जाता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता. एकीकडे अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त झाली, तर दुसरीकडे वाघाची दहशत होती. त्यामुळे जगावे कसे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. वाघाला जेरबंद करा किंवा ठार मारा यासाठी  शेतकरी व शेतमजूर समन्वय समितीच्या वतीने चेतन जयपूरकर व बापूराव मडावी यांच्या नेतृत्वात 12 ऑक्टोबरला रस्ता रोको आंदोलन केले.

विरूर  वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर शेतकरी संघटनेने अ‌ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात  शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. माजी आमदार सुदर्शन निमकर, अ‌ॅड. संजय धोटे, आमदार सुभाष धोटे  यांनी मुख्यमंत्र्यांकडे वाघाला ठार मारण्यासाठी परवानगी द्यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. लोकप्रतिनिधी, परिसरातील शेतमजूर व शेतकऱ्यांचा रोष वाढल्यामुळे वनविभागावर दबाव वाढला. शेतकऱ्यांनी ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली. मागील नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या मोहीमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी नेतृत्व‌ करीत ही मोहीम दोन आठवड्यात पूर्ण केली. या मोहिमेच्या यशामुळे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पथकातील सदस्यांचे अभिनंदन केले आहे. नरभक्षी वाघ जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा - वाघोबा पुढ्यात, शेतकरी मचाणावर ! काय घडले असेल तेव्हा...

आर टी वन सध्या नागपूरला घेतोय उपचार -
मंगळवारी 27 ऑक्टोबरला वाघाला जेरबंद केल्यानंतर रात्रीला नागपूर येथे हलविण्यात आले. गोरेवाडा प्राणी संग्रहालय व बचाव केंद्रामध्ये वाघाची तपासणी करण्यात आली. काही शारीरिक इजा असल्यास त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहे. काही महिने तो सध्या नागपूर येथेच मुक्कामी राहणार आहे.

संपादन - भाग्यश्री राऊत